येथे होते नवरदेवाचे हरण


आपण महाभारतात लग्नासाठी मुलींना पळवून आणल्याच्या कथा वाचतो. त्यातूनच अर्जुनाने केलेले सुभद्राहरण, कृष्णाने केलेले रुक्मिणी हरण यांची कथानके तयार झाली आहेत. भिष्माने आपल्या भावासाठी काशी राजाच्या स्वयंवराच्या मंडपातून आपल्या भावासाठी तीन मुली पळवून आणल्या होत्या. पण बिहारमध्ये उपवर मुलीचे पालक तिचे लग्न लावण्यासाठी मुलांना पळवून आणतात आणि त्याला शस्त्राचा धाक दाखवून किंवा त्याला अर्धवट बेेशुद्ध करून त्याचा विवाह लावला जातो. असा एक उलटा प्रकार नुकताच उघड झाला आहे. बोकारोच्या पोलाद प्रकल्पात कामाला असलेल्या कार्यकारी अभियंत्याला पळवून नेण्यात आले आणि त्याचा जबरदस्तीने विवाह लावण्यात आला. अर्थात हा प्रकार मुलीच्या पालकांनी आणि घरातल्या लोकांनी केला होता.

या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल झाली पण पोलिसांनी तपासाचा उपचार पार पाडण्यापलीकडे फारसे काही केले नाही कारण हा बिहारमध्ये नेहमीचा प्रकार आहे. अशा प्रकारे विवाह करण्याची प्रथा पडते की काय असा प्रश्‍न पडावा इतके प्रकार तिथे घडायला लागले आहेत. पळवून नेऊन लग्न लावलेल्या मुलाचे आई वडील आपल्या मुलाच्या अशा लग्नाची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या घरी जाऊन भांडतात पण फार पराकोटीला जात नाहीत. कारण लग्न तर पार पडलेले असते. धार्मिक रिवाजानुसार झालेले असते. आता भांडून काही फायदा नसतो पण त्यांना वाईट वाटते कारण त्यांचा मुलगा ठरवून लग्न झाले असते तर दोन तीन लाख हुंडा आणता झाला असता पण आता काहीही न मिळता त्याचे लग्न झालेले असते. तेव्हा त्यांची हळहळ ही हुंड्याची कमायी बुडली म्हणून असते.

अशा वेळी मुलीचा बापही फार ताणून धरत नाही. तो दोन तीन लाख काही नाही पण ५० हजार ते एक लाखापर्यंत हुंडा देऊन वर पित्याला शांत करतो. वधुपित्यालाही काही हा प्रकार मनापासून आवडलेला नसतो. पण त्याला हुंडा प्रथेचा जाच जाणवत असतो. अशा प्रकरणात पोलिसांत काही तक्रार दाखल होत नाही. दहात एखादे प्रकरण पोलिसांपर्यंत जाते आणि वर्षाभरात तीन ते साडे तीन हजार फिर्यादी येतात. म्हणजे अशा रितीने हजारो विवाह होत असतात. हा प्रकार एवढा बोकाळला आहे की मुलांना उचलून आणून त्यांचे विवाह लावून देण्याची सुपारी घेणार्‍या खास टोळया तयार झाल्या आहेत. त्यांना यातून लाखो रुपयांची प्राप्ती व्हायला लागली आहे.

Leave a Comment