महत्त्वाकांक्षी वायफाय सेवा


आजकाल लोक इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर करायला लागले आहेत. त्यातल्या त्यात हातातला मोबाईल फोन स्मार्ट असेल तर त्यावर ही सेवा उपलब्ध असते आणि लोक तो सतत हातात असल्यामुळे दिवसातला मोठा वेळ त्यावर इंटरनेट बघायला लागले आहेत. मात्र त्यासाठी वाय फाय सेवा जरूरी असते. ती नसेल तर मोबाईलवरून इंटरनेटशी कनेक्ट होता येत नाही आणि असे लोक बेचैन होतात. विशेषत: प्रवासात असताना हा अनुभव येतो. प्रवासात मुळात मोबाईल फोनलाच नेटवर्कची अडचण येते. म्हणून एस.टी. महामंडळाने आपल्या बसगाड्यांत नेटपॅक उपलब्ध करून दिले आणि बेचैन होणार्‍या प्रवाशांची सोय करून दिली. त्याचा परिणाम महामंडळाला जाणवायला लागला असून प्रवाशांची संख्या वाढली आहे.

लोकांना आता रात्रंदिन वाय फाय सेवा हवी आहे. रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी तर फार दीर्घकाळ प्रवास करीत असतात. दक्षिणेतून उत्तरेत कोठे जायचे झाले तर रेल्वेचा २४ ते २८ तासांचा प्रवास करावा लागतो. एवढा मोठा काळ प्रवासी इंटरनेटपासून दूर राहू शकत नाहीत. अशा लोकांना सातत्याने ही सेवा दिली पाहिजे हे आता रेल्वे प्रशासनाच्या लक्षात यायला लागले असून देशातल्या काही निवडक रेल्वे स्थानकांवर आता वाय फाय सेवा बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी समाधान व्यक्त करायला लागले असल्याने प्रशासनाने आता ही सेवा अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातल्या सर्व आठ हजार पाचशे रेल्वे स्थानकांवर मोफत वाय फाय सेवा पुरवण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे. या योजनेवर ७०० कोटी खर्च अपेक्षित आहे. योजना मोठी असल्याने ती टप्प्याटप्प्याने अंमलात आणली जाणार आहे. येत्या दोन महिन्यात म्हणजे मार्च अखेर ६०० स्थानकांवर ही सेवा सुरू होईल. आता २१६ स्थानकांना ही सेवा पुरवण्यात आलेली आहे. मार्च नंतरच्या टप्प्यात १२०० स्थानकांवर ही सेवा मर्यादित स्वरूपात दिली जाईल म्हणजे या स्थानकांवरील वाय फाय सेवेचा लाभ केवळ स्थानकाच्या परिसरात होईल म्हणजे प्रवाशांनाच होईल. नंतरच्या टप्प्यात ज्या ७३०० स्थानकांना ही सेवा पुरवली जाईल ती स्थानके प्रामुख्याने ग्रामीण भागातली असून त्यांना पुरवली जाणारी ही सेवा त्या गावांनाही वापरता येणार आहे. म्हणजे रेल्वेच्या या योजनेचा लाभ डिजिटल इंडिया या योजनेला होऊन ग्रामीण भागातही ही सेवा मिळून या भागात डिजिटल आर्थिक व्यवहारांनाही गती मिळणार आहे.

Leave a Comment