५० वर्षात या पछाडलेल्या स्टेशनवर थांबलेली नाही एकही ट्रेन


प.बंगालमधील बेगुनकोदर या स्टेशनवर गेल्या ५० वर्षात एकही ट्रेन थांबलेली नाही. या स्टेशनवरून या काळात एकही प्रवासी चढलेला नाही अथवा उतरलेला नाही. कारण या स्टेशनवर पांढर्‍या साडीतील एक भूत पाहिल्याचे अनेकांनी सांगितल्यापासून हे स्टेशन विराण झाले आहे.. गेल्या ५० वर्षात या स्टेशनच्या आसपासही कुणी फिरकलेले नाही मात्र बंगलोरच्या पॅरानॉर्मल रिसर्च टीमने नुकताच या स्टेशनवर रात्री मुक्काम करून येथे कोणत्याही प्रकारचे भूतखेत, प्रेतात्मा नसल्याचा निर्वाळा दिला आहे. अर्थात तरीही येथे कुणीही जाण्यास तयार नाही.

कोलकातापासून साधारण ६० किमी दूर असलेले हे स्टेशन आहे. या स्टेशनबाबत इतके प्रवाद आहेत की येथे कायम शांतताच असते. कुठलीही रेल्वे येथे थांबत नाही. १९६२ मध्ये हे स्टेशन बांधले गेले मात्र तेव्हा स्टेशनमास्तरनी पांढर्‍या साडीतील एक भूत येथे फिरत असल्याचा दावा केला व कांही दिवसांनी खुद्द स्टेशनमास्तरच मरण पावले तेव्हा या भूतानेच त्यांचा बळी घेतल्याचे बोलले जाऊ लागले. हे भूत म्हणजे रेल्वेखाली कांही काळापूर्वी ठार झालेल्या महिलेचे असल्याचा दावाही केला जातो. त्यामुळे रेल्वे कर्मचारी या स्टेशनवर काम करण्यास तयार नाहीत तसेच बदली कर्मचारीही येथे येत नाहीत. बिना स्टेशन मास्तर व बिना सिग्नल स्टेशन सुरू ठेवणे शक्यच नसल्याने ते बंद केले गेले असे समजते.आजही हे स्टेशन एकाकीच आहे.

Leave a Comment