थंडी कमी करण्यासाठी करा या पदार्थांचे सेवन


थंडीचा कडाका जसा वाढत जातो तसतसे कपाटामध्ये ठेवलेले गरम कपडे बाहेर यायला लागतात. त्याचबरोबर वाफाळत्या चहा कॉफीने वाजणारी थंडी कमी करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. पण चहा किंवा कॉफीच्या अतिसेवनाने भूक कमी होते, आणि त्याचबरोबर अन्नाद्वारे शरीराला मिळणारे पोषण कमी होते. सततच्या चहा कॉफीच्या सेवनाने झोप न येणे, अॅसिडीटी यासारख्या तक्रारी सुरु होतात. त्यामुळे थंडी पळविण्यासाठी सततच्या चहा कॉफीच्या सेवानापेक्षा इतर काही पदार्थांचे सेवन करणे जास्त आरोग्यदायी ठरू शकते.

तूप खाल्ले की वजन वाढते अशी सर्वसाधारण समजूत असते. पण तूपाचे सेवन शरीरासाठी हितकारी आहे, हे आता शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेले आहे. दररोज पंधरा ग्राम , म्हणजेच दोन लहान चमचे तूपाचे सेवन शरीरामध्ये उष्णता निर्माण करते. तसेच तुपाच्या सेवनाने त्वचेमध्ये आर्द्रता निर्माण होऊन त्वचा कोरडी पडत नाही. तुपाच्या सेवनाने पचनक्रिया सुधारून बद्धकोष्ठाची तक्रार असल्यास ती दूर होण्यास मदत होते.

हळद प्रकृतीने उष्ण आहे. हळदीच्या सेवनाने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. दररोज रात्री झोपण्याआधी एक ग्लास गरम दुधामध्ये पाव चमचा हळद घालून त्याचे सेवन करावे. हळद हे नैसर्गिक अँटी बायोटिक आणि अँटी सेप्टिक आहे. याच्या नियमित सेवनाने शरीरातील लहान मोठे घाव भरून येण्यास मदत होते. त्याशिवाय शरीरावरील सूज कमी होण्यास मदत होते. गरम हळदीच्या दुधाच्या सेवनाने थंडीमध्ये सतत उद्भविणारा सर्दी-खोकला लांब रहातो.

हिरव्या मिरचीमध्ये असणारे कॅप्सिसीन शरीरामध्ये त्वरित उष्णता निर्माण करते, त्याचमुळे एकदम झणझणीत हिरवी मिरची खाल्ली, की घाम फुटतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये, किंवा एरव्ही देखील स्वयंपाकामध्ये लाल मिरची पूड वापरण्यापेक्षा हिरवी मिरची वापरावी. ज्यांना हिरव्या मिरचीचा तिखटपणा सोसवत नसेल, त्यांनी जेवणामध्ये काळ्या मिरीचा उपयोग करावा.

थंडीमध्ये शेंगदाणे, तीळ आणि विशेष करून गुळ शरीराला उष्णता देणारा असतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये गुळाचे नियमित सेवन करावे. गुळाच्या नियमित सेवानाने सर्दी-खोकल्यासारखे विकार दूर पळतात. गुळामध्ये जीवनसत्वे, क्षार, लोह इत्यादी पिषक तत्वे मुबलक मात्रेमध्ये असतात. त्यामुळे मायग्रेन, अस्थमा, थकवा आणि अपचन हे विकार असणाऱ्या व्यक्तींसाठी गुळाचे सेवन विशेष फायद्याचे आहे. थंडीच्या दिवसांमध्ये छातीमध्ये कफ साठण्याची तक्रार उद्भवत असल्यास गुळ आणि आल्याचे सेवन नियमित करावे.

थंडीमध्ये सुका मेवा सेवन केल्याने शरीराला आवश्यक ती उष्णता मिळते. सुक्या मेव्यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे भरपूर मात्रेमध्ये असल्याने याचे सेवन शरीराला अतिशय फायद्याचे ठरते. त्यामुळे सकाळच्या नाष्ट्यासोबत किंवा मधल्या वेळच्या नाश्त्यासोबत सुक्या मेव्याचे सेवन अवश्य करावे. आपल्या आहारामध्ये बदाम, पिस्ते, अक्रोड इत्यादी सुक्या मेव्याचा समावेश करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही