सध्या आपल्या काही महान व्यक्तीवर चित्रपट काढले जात आहेत. बालगंधर्वांवर एक चित्रपट झाला. राज कपूरवर चित्रपट निघत आहे. सोनिया गांधीवर चित्रपट निघणार आहे पण बंगळूर मध्ये अशी एक सामान्य पण साहसी महिला आहे की जिच्यावर चित्रपट निघाला आहे आणि तो आता देशभर हजारोच नाही तर लाखो मुली आणि महिला पहात आहेत. पाहिल्यावर प्रभावित होत आहेत आणि आपल्या घरातल्या पुरुषांना हा चित्रपट पाहण्याचा आग्रह करीत आहेत. ही दक्षिण भारतातली सामान्य महिला म्हणजे बंगळूर शहरात टॅक्सी चालवणारी सेल्वी ही आहे. तिला दक्षिण भारतातली पहिली महिला टॅक्सी ड्रायव्हर होण्याचा मान मिळाला आणि आता ती अनेक महिलांचा आदर्श होऊन बसली आहे.
महिला टॅक्सी चालकावर चित्रपट
तिच्यावर चित्रपट काढण्याची कल्पना कोणा भारतीय चित्रपट निर्मात्याला सुचली नाही. ती कॅनडातल्या एका चित्रपट निर्माण करणार्या महिलेला सुचली. तिचे नाव एलिसा पालोसी. तिला सेल्वीची कहाणी मोठीच प्रेरक वाटली. कारण सेल्वी ही महिलांसाठी असाधारण समजले जाणारे एक कौशल्य हस्तगत करून पहिली महिला टॅक्सी ड्रायव्हर झाली आहे. अर्थात तिला तशी पार्श्वभूमीही आहे. तिची पार्श्वभूमीच तशी आहे. तिचा विवाह चौदाव्या वर्षी झाला पण विवाहाने तिच्या आयुष्यात आनंदाऐवजी वनवासच निर्माण झाला. सततचा छळ आणि वैताग यांना कंटाळून ती अठराव्या वर्षी घराच्या बाहेर पडली आणि टॅक्सी चालवायला शिकून स्वत:च्या पायावर उभी राहिली.
अर्थात ही कहाणी काही एवढी सोपी नाही. तिला आपले हे ध्येय साध्य करताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. म्हणून एलिसाने तिच्यावर हा लघुपट तयार केला आहे. तो लघुपट सोबत घेऊन आता एलिसा आणि सेल्वी यांनी एका बसमधून भारतभर फिरत असून लोकांना हा लघुपट दाखवत आहेत. हा लघुपट साधारण दीड तासाचा आहे. सेल्वी जरी दक्षिण भारतातली असली तरीही देशाच्या सर्व राज्यांत तिचा हा चित्रपट पाहिला जात आहे आणि अनेक मुलींना स्वावलंबी जीवन जगण्याची प्रेरणा देत आहे. अनेक मुलींमध्ये काही तरी करण्याची प्रेरणा जागी होत असतेच पण तिचा पाठपुरावा करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातली पहिली अडचण तर कुटुंबातच येते. म्हणूनच अनेक मुली स्वत: चित्रपट पाहून तो आपल्या घरातल्या पुरुषांनाही दाखवत आहेत आणि अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.