ही आहे भारतातील पहिली इलेक्ट्रिक सुपरबाईक


नवी दिल्ली : लवकरच देशातील पहिली इलेक्ट्रिक सुपरबाईक बंगळूरु स्थित दुचाकी स्टार्टअप कंपनी एमफ्ल्क्स मोटर्स बाजारात आणत आहे.

ही सुपरबाईक फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या २०१८ ऑटो एक्सपोमध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. एमफ्ल्क्स मॉडेल १ नावाची बाईक कंपनीकडून या ऑटो एक्स्पोमध्ये लाँच केली जाईल.

२०० किमी प्रतितासापर्यंत या बाईकचा स्पीड वाढू शकतो. पण ही बाईक ३ सेकंदात १०० किमी प्रति तास वेग पकडू शकते. या बाईकमध्ये लिक्विड कूल्ड एसी इंडक्शन इंजिन देण्यात आले आहे. सॅमसंगच्या लिथियम आयर्न बॅटरी यात वापरण्यात आल्या आहेत. या सुपरबाईकमध्ये दोन चॅनेलवाला एबीएस, ७ इंचाचा टीएफटी डिस्प्ले, जीपीएस नेव्हिगेशन, ऑटो अपडेट, मोबाईल अॅप आणि बाईक टू बाईक कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. दोन प्रकारांमध्ये ही बाईक उपलब्ध होणार असून एक १५० किमीच्या रेंजमधील तर दुसरी बाईक २२० किमी रेंजमधील असेल. या बाईकची किंमत ५-६ लाख रुपये असू शकते.

Leave a Comment