प्रिन्स विलियम आणि केट मिडलटन यांच्या विवाहाबद्दल काही रोचक तथ्ये


ब्रिटनच्या शाही घराण्यातील राजकुमार प्रिन्स विलियम आणि केट मिडलटन यांच्या विवाहाला आता सहा वर्षे उलटून गेली आहेत. पण विवाहाच्या वेळी केट ने परिधान केलेला वधूवेष, विवाहानंतर नवविवाहित दाम्पत्याने आयोजित केलेला स्वागत समारंभ या गोष्टींची चर्चा आजही केली जाते. ह्या विवाहाचे थेट प्रक्षेपण जगभरामध्ये कोट्यवधी लोकांनी आपल्या टीव्हीवरून पहिले होते. त्याच विवाहाबद्दल काही रोचक तथ्ये.

विलियम आणि केट च्या विवाहाच्या दिवशी, संपूर्ण ब्रिटन मध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तसेच नववधू व नवरदेवाचे ओझरते दर्शन घेण्यासाठी दोन मिलियन लोक रस्त्यांच्या दुतर्फा उपस्थित होते. खुद्द लग्नसमारंभासाठी राणी एलिझाबेथच्या नावे १९०० आमंत्रणे पाठविली गेली होती. विवाहाच्या दिवशी सकाळी राणी एलिझाबेथ हिने विलियम आणि केट यांना त्यांच्या नवीन उपाधी प्रदान केल्या. विलियम ‘ ड्यूक ऑफ केम्ब्रिज, अर्ल ऑफ स्ट्रॅटहर्न आणि बॅरन कॅरिकफर्गस ‘ , तर केट ला ‘ डचेस ऑफ केम्ब्रिज, काऊंटेस ऑफ स्ट्रॅटहर्न, व बॅरनेस कॅरिकफर्गस ‘ या उपाधी देण्यात आल्या.

या विवाहप्रसंगी करण्यात आलेल्या फुलांची सजावट ८००,००० डॉलर्स इतक्या किमतीची होती. तसेच विवाह समारंभासाठी चर्च मध्ये देखील पंचवीस फूट उंचीची सहा मेपलची झाडे लावण्यात आली होती. विवाहसमारंभ संपल्यानंतर ही झाडे प्रिन्स चार्ल्स यांच्या ‘ व्हेकेशन हाऊस ‘ मध्ये लावण्यात आली.

या समारंभासाठी केटने जो वधूवेष परिधान केला होता, त्याची किंमत ४००,००० डॉलर्स असून, सारा बर्टन या डिझायनरने अलेक्झँडर मॅकक्वीन या लेबल अंतर्गत हा वधूवेष डिझाईन केला होता. केट ने आपला मेकअप स्वतःच केला होता. मेकअप शिकून घेण्याकरिता केट ने मेकअप आर्टीस्ट अराबेला प्रेस्टन कडून मेकअपचे धडे घेतले होते. केटचा वधूवेष नव्या- जुन्याचे मिश्रण असलेला होता. तिच्या ड्रेससाठी वापरण्यात आलेली लेस अठराशे वर्षे जुनी पद्धत वापरून तयार केली गेली होती. तर तिने परिधान केलेले हिऱ्यांचे नवे इयररिंग्स तिच्या आई-वडिलांनी लग्नाची भेट म्हणून दिले होते. केट ने या प्रसंगी परिधान केलेला मुकुट राणी एलिझाबेथच्या संग्रही असलेल्या अनेक मुकुटांपैकी एक होता. हा मुकुट १९३६ साली तयार केला गेला होता.

प्रिन्स विलियमने परिधान केलेला पोशाख ( युनिफॉर्म ) ‘ स्वेट प्रूफ ‘ होता. त्याद्वारे विलियमला गरमीचा त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात आली होती. विवाहसमारंभ पार पडल्यानंतर राणी एलिझाबेथच्या वतीने ६५० विशेष अतिथींकरिता बकिंगहॅम पॅलेस मध्ये खास स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी आयोजित केलेल्या मेजवानीचा मेन्यू राणी एलिझाबेथ ने स्वतः ठरविला होता. एकूण २१ शेफ्स या कामी रुजू झाले होते. ह्या मेजवानी व्यतिरिक्त आणखी तीनशे पाहुणे सायंकाळी आयोजित केलेल्या आणखी एका स्वागत समारंभासाठी हजर होते. ही मेजवानी प्रिन्स चार्ल्स यांनी आयोजित केली होती.

Leave a Comment