केशसंभाराविषयी बरेच कांही


कोणाचेही व्यक्तीमत्त्व उठावदार दिसण्यासाठी अनेक कारणे असतात. शरीरयष्टी, बांधा, वर्ण, चेहर्‍याचे फिचर्स या शारीरिक कारणांबरोबरच कपडे, फॅशन, मेकअप, स्टाईल या बाह्य कारणांचाही त्यात हातभार लागत असतो. केस हे सौंदर्याचे एक प्रमुख लक्षण मानले पाहिजे. भरदार, काळे अथवा सोनेरी, लांबसडक किंवा आखूड केस माणसाच्या व्यक्तीमत्त्वात वेगळीच भर टाकत असतात.त्यात तर्‍हतर्हकहेने केल्या जाणार्‍या केशरचना चार चांद लावतात. हे केस म्हणजे नक्की असते तरी काय, याची माहिती अनेकांना नसते. अशा लोकांसाठी हा खास लेख

केस विंचरणे, त्यांच्या विविध रचना करणे, रंगविणे यात जगातील प्रत्येकजण दररोज कांही वेळ घालवितो. आरशासमोर उभे राहून केस दिवसातून किमान एकदा तरी केस विंचरले नाहीत असा माणूस विरळाच म्हणावा लागेल. अर्थात संपूर्ण टकले याला अपवाद असू शकतील. आपले केस केराटिन नावाच्या प्रोटीनपासून बनलेले असतात. विशेष म्हणजे जनावरांची शिंगे, खूर, पंजे, पक्षांचे पंख, चोच यात हेच प्रोटीन असते.


ओले केस खेचले तर ते आपल्या मूळ लांबीपेक्षा ३० टक्के अधिक खेचले जाऊ शकतात. केस बहुतेक उन्हाळ्यात अधिक वाढतात कारण या काळात उष्णतेने त्यांना अधिक रक्तपुरवठा होतो. केसात जीव नसतो त्यामुळेच ते कापले तरी दुखत नाहीत. मात्र केसांवरून रक्तगट अथवा संबंधित व्यक्तीची अधिक माहिती मिळू शकते. यामुळेच पोलिस अनेकदा केसांच्या तपासणीवरून गुन्हेगार शोधू शकतात. असे असले तरी एखादा केस महिलेचा का पुरूषाचा हे मात्र सांगता येत नाही कारण दोघांतही त्याची रचना सारखीच असते.

जगात काळ्या रंगाचे केस असलेले लोक संख्येने जास्त आहेत. लाल रंगाचे केस असलेल्यांचे प्रमाण केवळ १ टक्का आहे. डोक्यावरचा एक केस गळला तर त्याजागी नवा येतो. केसात ५० टक्के कार्बन, २१ टक्के ऑकिसजन, १७ टक्के नायट्रोजन, ६ टक्के हायड्रोजन, ५ टक्के सल्फर असते. तळहात व तळपाय तसेच ओठ या भागावर केस येत नाहीत. केसांचे सर्वसाधारण आयुष्य ५ वर्षे असते. माणसाच्या डोक्यावरील केसांचे वजन सरासरी १०० ग्रॅम असते. महिलांमध्ये दिवसाला केस तुटण्याचे प्रमाण ४० ते १५० इतके असते. अतिशय पातळ दिसणारा हा केस तांब्याच्या पातळ तारेपेक्षा अधिक मजबूत असतो.

Leave a Comment