गुगलने बंद केली अॅमेझॉनची युट्यूब सेवा


नवी दिल्ली – पुन्हा एकदा नव्याने गुगल आणि अॅमेझॉनमधील वाद समोर आला असून अॅमेझॉनच्या काही उपकरणांवरून युट्यूबची सेवा गुगलने आज काढून घेतली आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी आपल्या साईटवरून अॅमेझॉनने गुगलचे प्रोडक्ट विकणे बंद केल्यानंतर गुगलनेही जशाच तसे उत्तर म्हणून हा निर्णय घेतला आहे.

गुगलने आज जारी केलेल्या एका पत्रकात याबाबतची माहिती दिली आहे. यापुढे युट्यूबची सेवा अॅमेझॉनने नुकतेच लॉन्च केलेल्या स्क्रीन असणाऱ्या स्मार्ट स्पिकर्सवर वापरता येणार नसल्याचे गुगलने जाहीर केले. तसेच अॅमेझॉनच्या फायर टीव्हीवरही पुढील २५ दिवसांमध्ये युट्यूबची सेवा बंद करण्यात येणार असल्याचेही कंपनीने सांगितले. अनेक क्षेत्रामध्ये अॅमेझॉन आणि गुगल या दोन्ही कंपन्या एकमेकांचे मोठे प्रतिस्पर्धक असल्याने दोन्ही कंपन्या एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दोन्ही कंपन्यांनी आपले डिव्हाईस किंवा सेवा प्रतिस्पर्ध्याच्या माध्यमातून वापरली अथवा विक्री केली जाऊ नये यासाठी आता थेट एकमेकांच्या सेवा आणि प्रोडक्टवर बंदी घालण्याची टोकाची भूमिका घेतली आहे.

अॅमेझॉनच्या प्रवक्त्यांनी गुगलच्या या निर्णयाबद्दल बोलताना गुगलचा हा निर्णय निराशाजनक असून युझर्सला अशाप्रकारे निवडक उपकरणांवर एखादी सेवा वापरण्यापासून थांबवणे योग्य नसून आम्ही लवकरात लवकर गुगलबरोबर चर्चा करुन या वादावर योग्य तो तोडगा काढू असा विश्वास व्हर्ज वेबसाईटशी बोलताना त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment