
भारतात मेडिकल टुरीझम या व्यवसायाला फार चांगली संधी आहे असे म्हटले जाते. या व्यवसायातून २०१२ साली आपल्या देशाला १० हजार कोटी रुपये मिळतील असा अंदाज आहे. मॅकन्सी या संस्थेने हा अंदाज काढला आहे. भारतात या क्षेत्राचा अद्याप म्हणावा तसा विकास झालेला नसतानाही एवढ्या मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा आहे तर मग प्रत्यक्षात हा धंदा विकसित होईल तेव्हा किती उत्पन्न मिळवायची संधी आहे? मेडिकल टुरीझम क्षेत्रात काम करणार्या मेडिकल टूर पाल या संस्थेचे ऑपरेशन्स मॅनेजर डॉ. स्मित ठक्कर यांनी भारताला या व्यवसायातून आय. टी. क्षेत्राइतके पैसे मिळवता येतील असे म्हटले आहे. भारतात पर्यटन स्थळे खूप आहेत. वैद्यकीय उपचार उत्तम दिले जातात. त्यांचे दर अमेरिकेतल्या दरापेक्षा दहापटीने कमी असतात. आणि औषधे तुलनेने स्वस्तात मिळतात. या गोष्टींमुळे मेडिकल टुरीझमला संधी आहेच पण त्यापेक्षा काही गोष्टी अशा आहेत की ज्या जगातल्या इतर कोणत्याही देशात उपलब्ध नाहीत. भारतात केवळ शस्त्रक्रियाच नाही तर अवयव रोपणाच्याही शस्त्रक्रिया होतात आणि अलीकडे कॉस्मॅटिक उपचारही केले जायला लागले आहेत. या शिवाय भारतात योग, आयुर्वेद आणि निसर्गोपचार या उपचार पद्धतीही उपलब्ध आहेत. तशा तर जगात कोठेच नाहीत आणि या उपचार पद्धतीचे जगभरात आकर्षण वाढत चालले आहे. या सार्या गोष्टी विचारात घेतल्या तर या व्यवसायामुळे कितीतरी अन्य व्यवसायांना चालना मिळतेय याचा अंदाज येतो. त्यातून प्रचंड प्रमाणावर रोजगार निर्मितीही होते.
