आहार तज्ञ : नवे करीअर

आहार हा जीवनाचा आधार असतो पण किती खावे, कधी खावे आणि काय खावे याचे ज्ञान प्रत्येकालाच असते असे नाही. म्हणून लोकांना याबाबत सल्ला देणारे आहारतज्ञ पुढे येत आहेत. न्यूट्रिशनॅलिस्ट हा आता उत्तम व्यवसाय झाला आहे. लोक संपन्न होत आहेत आणि हातात पैसा असल्यामुळे दिसेल ते खात सुटले आहेत. मग वजन वाढले की आहार तज्ञांचा सल्ला घ्यायला लागले आहेत. सल्ल्यासाठी फीही भरपूर आकारली जाते त्यामुळे  तरुण मुली या व्यवसायात शिरायला लागल्या आहेत. एकदा व्यवसाय वाढायला लागला की व्यवसायात प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची गरज भासायला लागते आणि गरजेतून असे नवे नवे अभ्यासक्रम सुरू होत आहेत. मुंबईच्या एस एन डी टी विद्यापीठाच्या गृहविज्ञान पदवी अभ्यासक्रमात आहार आणि पोषणद्रव्ये असा एक विषय आहे आणि ही पदवी (बी.एससी. होम सायन्स) मिळवल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घ्यायची इच्छा असल्यास (एम. एससी) याच एका विषयात स्पेशलायझेशन करता येते. अनेक सरकारी वसतिगृहांत असे न्युट्रीशियन्स नोकरीस ठेवले जातात.  कारण वसतिगृहातल्या मुलांना योग्य तो आहार देणे आवश्यक असते. तो आहार पुरेशा पोषण मूल्याचा आहे की नाही हे तपासण्याचे काम या तज्ञांकडे असते.  त्याशिवाय मोठ्या रुग्णालयातही ही नोकरी असते. हा तर केवळ एक विषय झाला पण काही विद्यापीठांनी तर बी.एससी. च्या पूर्ण अभ्यासक्रमालाच न्यूट्रिशियन्स आणि फूट मॅनेजमेंट असे नाव देऊन अन्नाची संकल्पना व्यापक केली आहे. अशा आहार तज्ञांना लष्करातही  चांगल्या नोकर्‍या मिळतात. शिवाय आता आता काही व्यक्ती आपल्या खाजगी आहार तज्ञांचीही नेमणूक करायला लागल्या आहेत. त्यांच्या खाण्याच्या सवयी सांभाळून अन्नाचा समतोल साधणे हे त्यांचे काम होय.

पूर्वी प्रत्येक कुटुंबाचा एक फॅमिली डॉक्टर असे तसा हा प्रत्येक कुटुंबात एक आहार तज्ञही नेमला जायला लागला आहे. यासाठी पदवीधरांना चांगली संधी आहे.  आहाराचा संबंध शेवटी आपल्या शरीराशी आणि मनाशी असल्याने अन्नाचे यावर होणारे परिणामही अभ्यासले जातात आणि आहार शास्त्राची पदवी घेणार्‍या विद्यार्थ्यांना एम.एससी.ला एक्झरसाईज  फिजिशियन आणि न्यूट्रिशन असे विषय स्पेशलायझेशनला असतात. एसएनडीटी विद्यापीठातही असा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. आहार, व्यायाम, झोप एवढेच नव्हे तर अनेक प्रकारचे मानसिक आणि शारीरिक तणाव यावर सल्ला देणार्‍या अनेक कन्सल्टन्सीज आहेत. अशा कन्सल्टन्सीज मध्ये या पदवीधरांना आणि पदव्युत्तर पदव्या घेतलेल्या उच्च शिक्षित तरुणांना चांगली नोकरी मिळू शकते. ज्यांना फार भांडवल न गुंतवता काही उद्योग सुरू करण्याची इच्छा असेल अशा तरुणांना हा धंदा सुरू करण्याची  उत्तम संधी आहे. या व्यवसायाला फार भांडवल लागत नाही. गुरू नानक विद्यापीठ, लुधियाना, इंदिरा गांधी शरीर शिक्षण  विद्यापीठ नवी दिल्ली याही विद्यापीठात हे अभ्यासक्रम आहेत.

Leave a Comment