ध्वनी साधना विषयक अभ्यासक्रम

आपल्या सभोवताली झपाट्याने बदलत असलेल्या परिस्थितीने किती नवनव्या रोजगार संधी निर्माण झालेल्या आहेत याची कदाचित आपल्याला कल्पना सुद्धा नाही. परंतु १०-१५ वर्षांपूर्वी आपण ज्या गोष्टी छंद म्हणून करत होतो त्या सगळ्या गोष्टी आता शास्त्रशुद्ध विचार करून अभ्यासक्रमात बसवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचे पदवी, पदव्युत्तर असे अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. अभिनय हा असाच एक छंद. पण आता या छंदाला किती शास्त्रशुद्ध रूप देण्यात आलेले आहे हे आपण पहातच आहोत. अभिनय हा जन्मताच एखाद्याच्या अंगी असतो असे समजले जाते. परंतु तो शिकवता येतो हे आता या अभ्यासक्रमांनी दाखवून दिलेले आहे.

अभिनयामध्ये आवाजाला फार महत्व असते. त्यामुळे अभिनयाच्या प्रशिक्षणात किंवा इतरत्रही आवाजाची जोपासना करणे फार महत्वाचे ठरलेले आहे. ज्याला इंग्रजीमध्ये व्हाईस कल्चर असे म्हटले जाते. या संकल्पनेला मराठीत काय प्रतिशब्द असावा असा प्रश्‍न पहिल्यांदा पडला होता. परंतु स्वरसाधना असा शब्द त्यासाठी रूढ झाला आहे. अशोक द. रानडे यांच्यासारख्या तज्ञांनी या क्षेत्रात खूप काम केलेले आहे आणि त्यांनी अनेक अभिनेते, उद्घोषक आणि वक्ते यांचे आवाज दुरुस्त केलेले आहेत. त्यांच्या काही पुस्तकांचा अपवाद वगळता मराठीत फारशी पुस्तके सुद्धा नाहीत. मग अभ्यासक्रम कुठून असणार?

आता मात्र पुण्यात आणि मुंबईमध्ये व्हाईस कल्चर आणि डबिंग या विषयाचे अभ्यासक‘म सुरू करण्यात आलेले आहे. एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या मुंबई येथील एस.व्ही.टी. होम सायन्स कॉलेज मध्ये व्हाईस कल्चर आणि व्हाईस मॉड्युलेशन या विषयाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू आहे. या एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी दहावी उत्तीर्ण असणे ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. इच्छुकांनी www.svt.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. पुण्यात सुद्धा असा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम बारावीनंतरचा पदविका अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाचे नाव डिप्लोमा इन व्हाईस ऍन्ड डबिंग असे आहे. तक्षक आर्टस् ऍन्ड मुव्हीज प्रा. लि. ही संस्था हा अभ्यासक्रम चालवते. इच्छुकांनी www.takshak.gpspvtltd.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

गुजरातेतील लुनावाला येथे आदिती एज्युकेशन्स प्रा. लि. या संस्थेतर्फे सुद्धा व्हाईस कल्चर विषयीचे प्रमाणपत्र आणि पदविका असे अभ्यासक्रम चालवले जातात. बारावीनंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. संकेतस्थळ www.aditiedu.orgm. दिल्लीतील आर.के. फिल्मस् ऍन्ड मिडिया अकॅडमी ही संस्था सुद्धा हा अभ्यासक्रम चालवते. त्यात डबिंग आणि फ्रि कॉमेंटरी असे विषय घेतले जातात. संकेतस्थळ www.rkfma.com

Leave a Comment