सूरत, विशाखापट्टणम ही उभरती मोठी शहरे


भारतात मुंबई, कोलकत्ता, चेन्नई आणि दिल्ली ही चार दिशांना असणारी मुख्य महानगरे आहेत. गेल्या काही वर्षात विशेषत: मुक्त अर्थव्यवस्थेचा अंमल सुरू झाल्यापासून माहिती तंत्रज्ञान व्यवसायाने बंगळूर, पुणे, हैदराबाद ही शहरे मोठी आणि संपन्न झाली आहेत. गुजरातची राजधानी अहमदाबाद ही तर टेक्स्टाईल सिटी म्हणून नावाजलेली आहेच. साबरमती नदीच्या किनारी वसलेले अहमदाबाद हेही भारतातल्या मोठ्या आणि श्रीमंत शहरात समाविष्ट झालेच आहे पण गेल्या काही वर्षात देशातल्या दहा मोठ्या शहरांत गुजरातेतील सूरत आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या दोन शहरांनी शिरकाव केला आहे.

सूरत हे तसे पूर्वीपासून श्रीमंत शहर म्हणून माहीत आहे. मध्ययुगात ब्रिटीशांनी या बंदराला आपला तळ केला होता कारण मोगलांच्या काळातही येेथे परदेशातील व्यापार्‍यांच्या पेढ्या असत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत शहराची दोन वेळा लूट केली ती काही उगीच नाही. एवढी लूट करूनही सूरतमध्ये गडगंज संपत्ती शिल्लकच होती. त्या काळातली सूरतची ख्याती ही आर्थिक व्यवहाराचे केन्द्र म्हणून होती पण नंतरच्या काळात सूरतमध्ये वस्त्रोद्योग तर वाढलाच पण हिर्‍याच्या व्यापारातही त्याची ख्याती पसरली. आता या शहराचा लौकिक आहे तो भारतातले तिसर्‍या क्रमांकाचे स्वच्छ शहर असा आहे. शिवाय त्याचा आजचा विकास इतक्या वेगाने होत आहे की, ते जगातले चौथ्या क्रमांकाचे वेगाने वाढणारे शहर ठरले आहे. जगातले ९० टक्के हिरे सूरतमध्ये पॉलिश केले जातात. सूरतचे एकूण उत्पन्न ४० अब्ज डॉलर्स आहे. २०२० साली ते वाढून ५७ अब्ज डॉलर्स होण्याची अपेक्षा आहे.

आंध्र प्रदेशातून तेलंगणा हे नवे राज्य निर्माण झाल्यापासून विशाखापट्टणम हे उर्वरित आंध्र प्रदेेशातले सर्वात मोठे शहर आणि राज्याची आर्थिक राजधानी ठरले आहे. विशाखापट्टणम हे जगातल्या वेगाने वाढणार्‍या १०० शहरातले एक शहर ठरले आहे. हेही बंदर आहे आणि परदेशांशी होणार्‍या व्यापारामुळे ते सतत वाढत आहे. विशाखापट्टणमला स्थानिक लोक विझाग म्हणतात पण नंतर त्याचे विशाखापट्टणम असे नाव रूढ झाले आहे. या शहरात पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी समुद्र किनार्‍यांवर चांगली पर्यटन केन्द्रे उभारण्यात आली आहेत. या शहराने व्यापारात आघाडी घेतली असून त्याचे वट्ट वार्षिक उत्पन्न २६ अब्ज डॉलर्स एवढे झाले आहे. त्याने भारतातल्या पहिल्या दहा श्रीमंत शहरात आपला समावेश केला आहे.

Leave a Comment