कासवांचा चोरटा व्यापार


निसर्गात एक संघर्ष सुरू आहे. जो बलवान असेल आणि बदलत्या पर्यावरणाशी जमवून घेईल तो जगतो आणि जो निर्बल आहे तो नष्ट होतो. या जगात दररोज ५० हजारावर सजीव मरत असतात म्हणजे कायमचे नष्ट होत असतात. पण हा निसर्गातल्या संघर्षाचा परिपाक आहे. आता लक्षात आलेल्या काही तथ्यावरून असे दिसून आले आहे की, काही जलचरांच्या जाती माणसाच्या जिभेचे चोचले पुरवण्याच्या हव्यासापोटी नष्ट होत आहेत. त्यात प्रामुख्याने भारतातल्या कासवांचा समावेश आहे. भारतातून कासवंाची चोरटी निर्यात मोठ्या प्रमाणावर होत असून या तस्करीमुळे भारतातल्या कासवांच्या ४० जाती कायमच्या नष्ट होतील.

या संबंधात प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात भारतातून परदेशात नेली जात असलेली ५८ हजार ४४२ कासवे संबंधित सरकारी कर्मचार्‍यांनी पकडली आहेत. १९९३ साली अशीच कासवे पकडण्यात आली होती. पण त्यात ५ जातींची कासवे होती पण २०१७ पर्यंत पकडण्यात आलेल्या कासवांत १४ जातींची कासवे होती. अर्थात ही आकडेवारी प्रत्यक्षात हाती आलेल्या कासवांची आहे. मुळात अनेक जातींची कासवे निर्यात होत आहेत. २०१६ साली नदीच्या पाण्यातल्या कासवांची तस्करी वाढली म्हणून त्यावर विशेष लक्ष देण्यात आले. तेव्हा गंगा नदीच्या खोर्‍यातून ३० हजार कासवे परदेशात नेली जात असल्याचे दिसून आले. कासवांची निर्यात करण्याचे २२४ प्रकार उघड झाले होते. बांगला देश आणि चीनमधूनही अशी तस्करी होते असे दिसून आले आहे. लखनौ आणि कानपूर ही दोन शहरे कासवांच्या तस्करीची केन्द्रे बनली आहेत. या परिसरात नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर कासवे पकडण्याचा चोरटा व्यवसाय केला जातो. या कासवांना आग्नेय आशियातल्या देशात मोठी मागणी आहे.

या देशांत कासवांचे सेवन केले जाते. या मागणीची पूर्तता करण्यासाठी पश्‍चिम घाटातही कासवांची शिकार केली जाते आणि याच एका व्यवसायावर हजारो लोकांची उपजीविका साधली जाते. बंगाली लोक कासवाचे मांस खातात त्यामुळे भारतातील प. बंगाल आणि बांगला देश ही दोन मार्केट त्यांना मिळतात. अर्थात कासवांची शिकार करण्यास बंदी असल्यामुळे हा व्यापार चोर छुपे करावा लागतो. त्यासाठी ही वाहतूक पोत्यांत भरून करावी लागते. तसेच ती जंगलांतून केली जाते. उत्तर प्रदेशात अमेथी येथेही गेल्या वर्षी पोत्यांत भरलेली कासवे मोठ्या प्रमाणावर हस्तगत करण्यात आली होती.

Leave a Comment