कराचीपेक्षा मुंबई सुरक्षित


पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई या दोन शहरात एके काळी दहशतवादी कारवायांना ऊत आला होता. आता दोन्ही ठिकाणचे अतिरेकी हल्ले कमी झाले आहेत पण तरीही या शहरांतल्या लोकांना असुरक्षित आहोत असे वाटते. जगातल्या ६० शहरांत सुरक्षिततेच्या बाबतीत मुंबईचा क्रमांक ४४ वा आहे. म्हणजे जगातल्या असुरक्षित १६ शहरांत मुबईचा क्रमांक लागतो. दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेल्या मुंबई आणि कराची या दोन शहरात कराची तिथल्या लोकांना अधिक असुरक्षित वाटते कारण कराचीचा समावेश या यादीतल्या शेवटच्या तीन शहरांत झाला आहे. अर्थात या दोन शहरांत झालेला पूर्वीचा हिंसाचार सारखा नव्हता. मुंबईत पाकिस्तानी अतिरेकी संघटना स्फोट घडवून आणून निष्पाप लोकांच्या हत्या करीत होत्या तर कराचीत मोठ्या प्रमाणावर गँगवॉर होत होते.

जगातली सर्वात सुरक्षित शहरे म्हणून जपानची राजधानी टोकियो, सिंगापूर आणि ओसाका यांची नोंद झाली आहे. जगात वाढत चाललेल्या अतिरेकामुळे केवळ शांतताच बाधित झाली आहे असे नाही तर सायबर सिक्युरिटी, आरोग्यविषयक सुरक्षितता, पायाभूत सोयीतील सुरक्षितता यांनाही धोका निर्माण झाला आहे. तेव्हा इकॉनॉमिक्स इंटेंलिजन्स युनिट या संस्थेने जगातली या सर्व प्रकारातली सुरक्षितता अनुभवणारी शहरे कोेणती याचा शोध घेतला. ६० असुरक्षित शहरांची निवड करून गेल्या दोन वर्षात या शहरांत काय सुधारणा झालीय याचा अंदाज घेतला तेव्हा मुंबईचा क्रमांक केवळ एकाने वाढलेला दिसला. दिल्लीचा क्रमांक फार काही वर नाही पण तो मुंबईपेक्षा एका आकड्याने वर आहे.

जगातली तीन सर्वात असुरक्षित शहरे म्हणून कराची, ढाका (बांगला देश) आणि यंगोन (म्यानमार ) यांचा क्रमांक लागला आहे. म्हणजे ही जगातली सर्वात अधिक असुरक्षित शहरे आहेत. या पाहणीतला सुरक्षिततेचा निकष फार प्रगत आहे. ही शहरे भूकंपाच्या भीतीच्या छायेतही जगत आहेत. पण तिथल्या लोकांना भूकंप झाल्यास काय करावे आणि आपला जीव कसा वाचवावा याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. मुंबईचा क्रमांक फार खाली जाण्यामागचे हेही एक कारण आहे कारण मुंबईत असे शिक्षण दिले जात नाही. टोकियोत ते दिले जाते. आपत्कालीन योजना हा शब्द केवळ वापरला जातो पण १८ वर्षावरील प्रत्येेकाला या योजनेचे प्रशिक्षण दिले पाहिजे ते दिले जात नाही.

Leave a Comment