सरदार पटेल नसते तर…….


आज सारा देश सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करीत आहे. नव्या पिढीला त्यांची पुरती ओळख नाही पण ती असण्याची गरज आहे. ते भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान होते. आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा देशात ६०० संस्थाने होती. ब्रिटीशांची सत्ता असलेला भारत देश हा स्वतंत्र झाला पण या ६०० संस्थानांनी काय करावे याचा निर्णय ब्रिटीशांनी केले नव्हता. ती सारी संस्थाने भारतात विलीन झाली खरी पण त्यांच्यावर तशी सक्ती नव्हती. त्यांना सरदार पटेल यांनी भारतात विलीन करून घेतले. ही एक मोठी कामगिरी त्यांनी भारताचे गृहमंत्री म्हणून केली. त्यांच्या या कामगिरीमुळेच आता आपल्याला दिसतोय तसा भारत देश साकार झाला आहे. त्यांनी हे केले नसते तर भारतात ६०० लहान लहान देश अस्तित्वात राहिले असते.

जर्मनीत अशीच कामगिरी ओटो फान बिस्मार्क याने केली होती. त्यामुळे भारताला असे अखंड करणार्‍या सरदार पटेलांना भारताचे बिस्मार्क म्हटले जाते. ते मोठ्या खंबीर स्वभावाचे आणि कुशल प्रशासक होते. त्यांनी आपल्या गृहमंत्रीपदाच्या काळातच आय. ए. एस. ही प्रशासकीय सेवा प्रस्थापित केली आणि ही पदवी मिळवलेल्या अधिकार्‍यांनी प्रशिक्षण देणारी संस्था मसुरी येथे निर्माण केली. तिलाच आज लालबहादूर शास्त्रे यांचे नाव दिलेले आहे. पटेलांनी ६०० संस्थाने भारतात विलीन करताना साम, दाम, दंड आणि भेद या कौशल्यांचा वापर केला. ही संस्थाने विलीन झाली पण हैदराबाद, जुनागढ आणि काश्मीर या तीन संस्थानांनी भारतात विलीन होण्यास नकार दिला. यातला हैदराबादचा प्रश्‍न सरदार पटेल यांनी लष्करी कारवाई करून सोडवला.

हैदराबाद हे संस्थान हे निजाम स्टेट म्हणून ओळखले जात होते. तेलंगणा हे राज्य, मराठवाडा आणि आजच्या कर्नाटकातील बीदर, गुलबर्गा आणि रायचूर हे तीन जिल्हे एवढे हे संस्थान होते. संस्थानिक असलेल्या निजामाला आपले संस्थान पाकिस्तानात विलीन करायचे होते. पटेलांनी हा प्रश्‍न लष्करी कारवाईने सोडवला नसता तर आजच्या महाराष्ट्रातला मराठवाडा हा भाग पाकिस्तानात असला असता. सोलापूर पासून २५ किलोमीटर्सवर मराठवाडा सुरू होतो. तिथून २० किलो मीटर्सवर छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी असलेल्या भवानीचे तुळजापूर हे तीर्थक्षेत्र आहे. पटेलांनी योग्य निर्णय घेतला नसता तर लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान पाकिस्तानात गेले असते आणि भवानीच्या दर्शनाला जाण्यासाठी आपल्याला पाकिस्तान सरकारची अनुमती घ्यावी लागली असती.

Leave a Comment