कॅनडात भारतीयांचे वर्चस्व


भारताला आणि चीनला वाढती लोकसंख्या सतावत असली तरी या जगात असे काही देश आहेत की ज्यांना आपली लोकसंख्या कशी वाढवावी असा प्रश्‍न पडला आहे. अशा देशात लोकसंख्या कमी पडत असल्यामुळे तिथे परदेशातून आलेल्या स्थलांतरितांचे स्वागत केले जाते कारण घटत्या लोकसंख्येमुळे तिथे मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. कॅनडा हा असाच एक देश आहे. कॅनडाची लोकसंख्या घटत चालली असल्यामुळे तिथे बाहेरून येणार्‍या लोकांची संख्या वाढली आहे. अशा स्थलांतरितांत भारताचे वर्चस्व आहे. २०११ ते २०१६ या पाच वर्षात कॅनडात स्थायिक झालेल्या परदेशी नागरिकांत भारताचा क्रमांक दुसरा आहे. या काळात या देशात १२ लाख लोक स्थायिक झाले त्यातले एक लाख ४७ हजार लोक म्हणजे १२ टक्के लोक एकट्या भारतातले होते.

या बाबतीत फिलिपाइन्सचा पहिला क्रमांक आहेच पण चीनही काही मागे नाही. मात्र गेल्या पाच ते सहा वर्षात या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे. कॅनडात हजारो एकर जमीन आहे आणि कष्ट करणारी लोकसंख्या कमी होत असल्यामुळे जमीन पडून रहायला लागली आहे. वास्तविक कॅनडा हा जगातला अग्रेसर गहू उत्पादक देश आहे. पण मुनष्यबळाच्या अभावी जमिनी पडून राहिल्यामुळे तिथल्या गव्हाच्या उत्पादनावर आणि एकूणच शेती व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. आता आपल्याला देशाचे वैभव टिकवून ठेवायचे असेल तर बाहेरच्या देशातून येणार्‍या निर्वासितांचे स्वागत करायला हवे हे त्यांच्या लक्षात आले आहे. लोकसंख्येचे प्रवाह कसे विपरीत असतात याचा अनुभव या निमित्ताने येत आहे.

भारतातून कॅनडात जाणार्‍या लोकांत पंजाबातल्या शेती व्यवसायाची पार्श्‍वभूमी असलेल्या लोकांचा मोठा भरणा असून त्यांना कॅनडात मोठा आश्रय मिळत आहे. त्यातले अनेक पंजाबी लोक तर बेकायदा रित्या कॅनडात घुसलेले आहेत पण तरीही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना स्वीकारले जात आहे आणि कॅनडात ओस पडत चाललेली शेती त्यांना देऊन त्यांना कृषि व्यवसाय वाढवण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. जगातल्या अनेक देशात बाहेरच्या लोकांनी स्थलांतर केले आहे. त्यात यूरोेपातल्या लोकांचा मोठा भरणा होता. त्यांनी तिथे जाऊन उद्योगधंदे वाढवले. पण आता कॅनडात आलेल्या लोकांत यूरोपीय कमी आणि आशियाई लोक जास्त असे वेगळे चित्र आहे आणि स्थलांतरित लोक शेती करीत आहेत.

Leave a Comment