भारत हा अपघातांचा देश


भारतात वाहनांचे अपघात हे मृत्यूचे मोठे कारण आहे. या संबंधात काही आकडे हाती आले आहेत. केन्द्र सरकारच्या नागरी विकास मंत्रालयाने २०११ सालचे जनगणनेचे काही आकडे हाती आल्यानंतर त्यांचे विश्‍लेषण करून या बाबत काही आकडे समोर आणले आहेत. या मंत्रालयाने लोकसंख्या, वाहनांचे आकडे आणि अपघातांचे प्रमाण यांचा तपशीलवार अभ्यास केल्यानंतर असे दिसून आले की, भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या १७ टक्के एवढी आहे. पण जगातल्या वाहनांपैकी केवळ एक टक्का वाहने भारतात आहेत. याचा अर्थ भारतात आगामी काळात वाहनांची संख्या फार वाढण्याची अपेक्षा आहे. आज वाहने कमी आहेत.

ती जगातल्या वाहनांच्या केवळ एक टक्का एवढीच आहेत पण जगात जेवढे अपघात होतात त्याच्या सहा टक्के अपघात भारतात होतात. वाहने एक टक्का असतील तर अपघातही एक टक्का व्हावेत अशी अपेक्षा आहे पण त्याऐवजी ते सहा टक्के म्हणजे अपेक्षेच्या सहापटीने जास्त होतात. या अपघातात मरणारांची संख्याही जगात अशा अपघातात मरणारांच्या दहापटीने जास्त असते. म्हणजे भारतातली वाहनांची संख्या कमी , अपघातांची संख्या आणि त्यात मरणारांची संख्या जास्त अशी स्थिती आहे. वाहने कमी असताना ही स्थिती आहे तर वाहने संख्येने वाढायला लागून ती अमेरिकेसारखी होतील तेव्हा आपल्या देशातल्या शहरात राहणे किती धोकादायक होईल याचा अंदाजही करता येत नाही. आजच शहरातली रस्त्यांची जागा वाहनांनी, फेरीवाल्यांनी आणि अतिक्रमणे करणारांनी व्यापलेली असते. त्यामुळे वाहने वेगाने चालवताही येत नाहीत.

मुंबईत आणि अन्य काही शहरांत लोक लाखो रुपये खर्चुन वेगाने जाणारी वाहने खरेदी करतात पण त्यांना शहरातल्या रस्त्यांतली गर्दी चुकवत चुकवत गाडी एवढी हळू चालवावी लागतात की अगदी गर्दीच्या वेळा त्यातल्या कित्येक वाहनांना ताशी १२ किलो मीटर इतक्याच वेगाने जाता येते. मुंबईत तर काही रस्ते एवढे भरलेले असतात की, काही वेळा त्यांना ताशी पाच किलो मीटर्स एवढाही वेग गाठता येत नाही.आता आपल्या देशात ३१ टक्के लोक शहरांत राहतात पण २०३१ साली हे प्रमाण ४० टक्के होणार असून २०५० साली देशातले साठ कोठी लोक शहरात गर्दी करणार आहेत. ही गर्दी आणि त्यांची वाहने यांची गर्दी कमी करायची असेल तर कारची संख्या कमी करून सिटी बस, मेट्रो रेल्वे, स्कूल बस यांची संख्या वाढवावी लागेल.

Leave a Comment