दोन दातांनी इतिहास बदलणार


ही मानवी जात कशी, कोठे आणि कधी अस्तित्वात आली याचे संशोधन करणे किती कटकटीचे असेल हे त्या क्षेत्रातले संशोधकच सांगू शकतील. कारण हा मानव प्राणी साधारण एक कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आला असावा असह तर्क करण्यात आला आहे. एक कोटी वर्षांपूर्वी तो माणूस नव्हता तर माकड होता. त्या काळात नेमके काय घडले हे काही कोणी लिहून ठेवलेले नाही. कारण तो त्या काळात काही लिहू शकत नव्हता. त्याला हात होते की नाही हेही माहीत नाही. अगदी त्याला बोलायलाही येत नव्हते. उत्क्रांतीत त्यात काही बदल होत गेले आणि त्याची जिभ, टाळू, दात, ओठ यांचे काही विशिष्ट आकार निर्माण झाले तेव्हा तो आवाज काढायला लागला.

या गोष्टी केव्हा घडल्या असतील याचे काही अवशेष सापडल्यावर त्यांच्यावर संशोधन करावे लागते आणि मगच कळते की त्याला नेमके कधी बोलायला यायला लागले. हाती आलेल्या अवशेषांचा कालावधी नेेमका कोणता असावा याची परीक्षा कार्बन टेस्टने करता येत आहे म्हणून सापडलेल्या अवशेषाचा कालावधी निश्‍चित करता येतो. त्यावरून काही अनुमान केले जाते. त्यावर काही प्रमेये नक्की केली जातात पण माणसाचे संशोधन सतत सुरू असते आणि काही नवा पुरावा हाती आला की सारी जुनी प्रमेये बाद ठरतात. इतिहासात असेच होते. इतिहासात काय घडले असेल याचे काही अनुमान केले जाते पण नव्या पुराव्याचा एक तुकडा सुद्धा सारे अनुमान बदलायला लावतो.

आता असाच एक पुरावा समोर आला असून त्यामुळे मानवाच्या उत्पत्तीचा आजवर मानला जाणारा इतिहास बदलावा लागणार आहे. मानव प्राणी आधी आफ्रिकेत उदयाला आला आणि नंतर तो अन्नाच्या शोधात भटकत गेला. त्या त्या ठिकाणी तो स्थायिक झाला आणि तिथल्या भूगोलानुसार त्यात बदल होत गेले असे आजवर मानले जात आहे. कारण मानवाचे सुमारे ५० लाख वर्षांपूर्वीचे अवशेष आफ्रिकेत सापडले आहेत. ते सर्वात जुने असल्याने मानव प्राणी आफ्रिकेत उदयाला आला असे मानले जाते पण आता जर्मनीत एक उत्खननात मानवसदृश्य प्राण्याचे दोन दात सापडले आहेत. आता या दोन दातांमुळे सारे अनुमान बदलावे लागणार आहे कारण जर्मनीत सापडलेलया या दातांचा कालावधी ९५ लाख वर्षे इतका आहे. याचा अर्थ आता असे मानावे लागणार आहे की, पहिला मानव जर्मनीत निर्माण झाला आणि नंतर तो आफ्रिकेत गेला. दोन दातांमुळे मानवाविषयीचे प्रमेय बदलावे लागणार आहे.

Leave a Comment