भारतात फळे, भाज्यांची प्रचंड नासाडी


भारतात हरित क्रांती होऊन धान्याची मोठी पैदास झाली पण धान्य साठवण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे तसेच वाटपाचे नियोजन नसल्यामुळे गरिबांना हे धान्य मिळतही नाही आणि ते नीट न साठवल्याने त्याची मोठी नासाडी होते. एका स्वयंसेवी संघटनेने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली तेव्हा देशात ४० हजार टन धान्य साठवण्याची व्यवस्था नसल्यामुळे वाया जाते असे सांगण्यात आले. आता हीच स्थिती दूध, भाज्या आणि फळांच्या बाबतीत आली आहे. शेवटी धान्य हे काही दुधासारखे नाशवंत नसते म्हणून धान्याची नासधूस तुलनेने कमी असते. फळे, भाज्या आणि दूध हे नाशवंत असल्यामुळे त्यांची साठवणूक करण्याचंी सोय नसली म्हणजे धान्यापेक्षाही अधिक नासाडी होते.

असोचेम या संघटनेने याबाबत एक पाहणी केली असता असे आढळून आले की, आपल्या देशात या तीन नाशवंत मालाचे जेवढे उत्पादन होते त्याच्या ४० ते ५० टक्के एवढे उत्पादन वाया जाते, नासते आणि कुजते. आता आपला जगात दुधात पहिला क्रमांक आहे. भाज्या आणि फळांच्या उत्पादनात दुसरा क्रमांक आहे. आपण मनात आणले तर निम्म्या जगाला दूध आणि भाज्या पुरवू शकतो. तेवढे उत्पादन आपण करतोही पण ते जगाला न पुरवता आपण त्यातला जवळपास निम्मा माल नासवून, कुजवून उकिरड्यावर फेकतो. त्यामुळे मालाची तर नासाडी होतेच पण उकिरड्यावर टाकल्याने त्याचा दुर्गंध सुटून रोगराई पसरते. निर्माण झालेला हा माल साठवण्याच्या पुरेशा सोयी करण्यात आलेल्या नसल्याने आपले हे नुकसान होत आहे.

आपले हे नुकसान ४४० अब्ज डॉलर्स एवढे प्रचंड आहेे. ते रुपयांत मोजायचे झाल्यास साधारणत: २४ लाख कोटी रुपये एवढे भरत. आपण उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला पण साठवण्याची योजना आखली नाही. त्याचा आपल्याला हा परिणाम भोगावा लागत आहे. ही उत्पादने अशी नासून आपले हे मोठे नुकसान टळावे यासाठी त्यांना गोदामे आणि कोल्टड स्टोअरेज उपलब्ध करून दिले पाहिजेतच पण तूर्तास यावर एक मार्ग आहे तो म्हणजे या मालावर प्रक्रिया करणे. आपण दूध वाया घालवण्यापेक्षा त्याची पावडर केली पाहिजे. फळांवरही अनेक प्रकारच्या प्रक्रिया करता येतात. त्यामुळे नासाडी तर टळतेच पण प्रक्रिया केलेल्या मालाला जास्त भाव मिळून शेतकर्‍यांना जास्त पैसे मिळतात. जगात आपला उत्पादनात पहिला क्रमांक असला तरीही प्रक्रियेत शेवटचा क्रमांक आहे. त्यामुळे ही हानी होते.

Leave a Comment