फतवेशाहीला प्रत्युत्तर


मुस्लिम समाजाने कसे वागावे आणि बदलत्या कालमानातही आपल्या धर्माचा आचारधर्म कसा सांभाळावा याचा निर्णय करणारे काही धर्मगुरू उत्तर प्रदेशात बसले आहेत आणि ते या संबंधात काही समस्या निर्माण झाली की फतवा काढून आपले मत जाहीर करीत असतात. या संस्थेचे नाव दारूल उलूम असे आहे. गेल्या आठवड्यात वाराणसी येथे काही मुस्लिम महिलांनी दिवाळीत श्री रामाची आरती केली. मुस्लिम धर्माला अशी मूर्तिपूजा मान्य नाही. त्यामुळे दारूल उलूमच्या धर्मगुरूंनी या महिलांचे हे कृत्य धर्मबाह्य ठरवले. या महिलांनी आता या महिला अशा कृत्याबद्दल धर्मबाह्य ठरल्या आहेत तेव्हा त्यांनी अल्लाची क्षमा मागून कुराणातल्या काही कलमा वाचाव्यात आणि धर्मात पुन्हा प्रवेश करावा असा फतवा त्यांनी काढला.

या दरम्यान याच धर्मगुरूंनी काही फतवे काढले होते. त्यातला एक फतवा तर नुकताच काढला असून मुस्लिम महिलांनी सेल्फी काढू नये असे फर्मावले आहे. त्यापूर्वी त्यांनी असाच एक फतवा काढला होता. त्यात मुस्लिम जोडप्यांनी जोडीचा फोटो काढून तो मोबाईलवर अपलोड करू नये असे बजावले होते. अर्थात हा फतवा त्यांनी एका जोडप्याने सल्ला विचारल्यावरून काढला होता. त्यांना आपला फोटो अपलोड करायचा होता पण तसे करणे धर्मात बसते का नाही हे त्यांना पहायचे होते म्हणून त्यांनी सल्ला विचारला होता. त्यापूर्वी दारुल उलूम ने आणखी एक फतवा काढला होता आणि मुस्लिम महिलांनी केस कापू नयेत तसेच भुवया कोरू नयेत असे जाहीर केले होते. या दोन्ही बाबी धर्मबाह्य आहेत असे त्यांनी बजावले होते.

वाराणसीतील महिलांवर फतवा जारी करण्यात आला पण या महिलांनी तो फतवा जुमानला नाही. आपण मुस्लिम असलो तरी पूर्वी हिंदूच होतो आणि भगवान श्रीराम हे आपले पूर्वज आहेत. म्हणून त्यांची पूजा करण्यात धर्मबाह्य असे काही नाही. आपण काही आजपासून ही आरती करीत नाही तर २००६ पासून करीत आहोत. असेही या महिलांनी या संस्थेला कळवले आहे. एवढेच नाही तर तुम्ही काय फतवे काढायचे ते काढा, आम्हाला जसे वागायचे तसे आम्ही वागू असेही या महिलांनी या धर्मगुरूंना कळवले आहे. एक काळ असा होता की माणसाच्या सगळ्या जीवनाची सूत्रे धर्माच्या हातात होती. त्या काळात असे फतवे व्यवहार्य होते कारण ते फतवे मानले नाहीत तर ते न मानणार्‍यांना सजा होत होती. आता तसे काही होत नाही. तेव्हा असे फतवे काढणे हे निरर्थक आहे.

Leave a Comment