नवरा म्हटला की मारणारच


आपल्या समाजात नवरा आणि बायको यांचे नाते नेमके काय असते यावर अनेक मते व्यक्त केली जातात. नवरा हा बायकोचा मालक असतो असे मानणारा मोठा वर्ग या समाजात आहे. एकदा विवाह झाला की बायकोच नवर्‍याच्या घरी येते. मग तिला त्याची मर्जी सांभाळतच जगावे लागते. या कल्पना आपण मान्य केलेल्या असल्याने आपल्याला त्याचे काही वाटत नाही पण जुन्या काळातल्या गुलामाचे जगणे जसे मालकाच्या मर्जीवर होते तसेच आज विवाहित महिलांना नवर्‍याच्या आधीन राहून जगावे लागते. याचाच एक भाग म्हणजे नवर्‍याने बायकोला शिवीगाळ करणे किंवा लहान सहान कारणावरून मारणे. एकदा नवरा म्हणजे मालक हे मान्य केले की, मारहाण ही सुद्धा अपरिहार्यच मानण्याचा प्रघात आहे.

आपल्या समाजाच्या काही वर्गात तर नवर्‍याची बायकोला होणारी मारहाण हा नित्यक्रमच मानला जातो. वास्तविक या गोष्टीची महिलांना चीड यायला हवी पण महिलाही त्याचे समर्थन करतात. नवर्‍याने बायकोला मारणे हे योग्य की अयोग्य असा प्रश्‍न उपस्थित केला असता बर्‍याच महिला त्याचे उत्तर, नवराय मग ! मारणारच. नवर्‍याने बायकोला मारले तर त्यात गैर काय ? असे उत्तर देतात. ओडिसात करण्यात आलेल्या कुटुंब सर्वेक्षणात महिलांना हा प्रश्‍न विचारण्यात आला तेव्हा ५९ टक्के महिलांनी, नवर्‍याने बायकोला मारले तर त्यात काही गैर नाही असे उत्तर दिले. बायकोला होणारी नवर्‍याची मारहाण ही बायकांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर समर्थनीय वाटत असली तरीही पुरुषांना मात्र ती तेवढ्या प्रमाणावर योग्य वाटत नाही. ही मारहाण योग्य आहे असे केवळ ४० टक्के पुरुषांनी म्हटले आहे.

मुळात हा प्रश्‍न का विचारावा लागला ? ही सरकारने केलेली कुटुंब पाहणी असल्याने, कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबतीत हा प्रश्‍न विचारण्यात आला होता. महिलांची नवरेशाहीतून सुटका व्हावी यासाठी सरकारने हा कायदा केलाय पण मुळात ही नवरेशाही महिलांनाच जाचक वाटत नाही. घरातले काम चुकले, स्वयंपाक नीट केला नाही, घरातल्या वृद्धांशी आदराने वर्तन केले नाही, शरीर संबंधांना नकार दिला अशा कारणांनी नवरा बायकोला मारू शकतो आणि तो त्याचा हक्कच आहे असे या लोकांना वाटतो. आज महिला एवढ्या पुढे चालल्या आहेत की, मुळात स्वयंपाक करणे ही केवळ बायकोची जबाबदारी नाही असे त्या मानायला लागल्या आहेत. एका बाजूला अशी सुधारणा होत असताना ६० टक्के महिला स्वयंपाक बिघडल्यास नवर्‍याने बायकोला मारले यात काही गैर मानत नाहीत. यावरून आपली मानसिकता कळते.

Leave a Comment