भीमकाय बाळाच्या समस्या


महाभारतातला भीम रानावनात कोठे तरी जन्माला आला कारण तो जन्मला तेव्हा त्याचे वडील पंडू आणि आई कुंती हे वनवासात होते. महाभारतात असे म्हटले आहे की, तो जन्माला आला तेव्हा हे बालक महाकाय आणि पराक्रमी होईल अशी आकाशवाणी झाली. अर्थात तशी आकाशवाणीही होण्याची गरज नव्हती कारण भीम जन्माला आला तोच मुळे एक पाषाणावर आणि जन्माला आल्याबरोबर एका मोठ्या शिलेवर पडला. शिलेवर पडल्याने त्याला काहीच झाले नाही पण ती शिला मात्र भंगली. ही सारी पुराणातली वांगी आहेत का ? आता अशी बालके जन्माला येतात का असे प्रश्‍न मनात निर्माण होऊ शकतात. आताही काही बालके अशी महाकाय स्वरूपात जन्माला येताना दिसतात.

त्यांची नावे, त्यांच्या माता पित्याची नावे आणि त्यांची चढती वाढती वजने यांच्या व्यवस्थित नोंदी केल्या जात असतात. त्यावरून जगातले सर्वात मोठे महाकाय बाळ मेक्सिकोत जन्माला आले असल्याची नोंद आहे. अशी बाळे जन्माला येतात तेव्हा त्यांचे वजन असाधारण असते. ते जास्त असल्याने ही बाळे सुदृढ मानली जातात. पण नंतर हळुहळु त्यांचे वजन वाढण्याचे प्रमाण आणि त्यांची अनैसर्गिक वाढ लक्षात यायला लागते आणि हे मूल सुदृढ नसून जाडपणा वाढण्याचा एक विकार सोबत घेऊनच जन्माला आले आहे ही वस्तुस्थिती समजते. मेक्सिकोत आता १० महिन्याचे असलेले लुईस मॅन्युअल हे बाळ असेच जाडपणाचा शाप घेऊन जन्माला आले असून त्याचे वजन आताच ३० किलो इतके आहे. ते जन्माला आले तेव्हा त्याचे १४ पौंड हे वजन छान वाटले होते पण ते पहिल्याच महिन्यात एवढे वाढले की त्याला दोन वर्षांच्या मुलाच्या आकाराचे कपडे घायायला लागले. आता हे बाळ १० महिन्यांचे आहे पण त्याचे वजन ३० किलो आहे.

हे वजन ९ वर्षांच्या चांगल्या सुदृढ मुलाच्या वजनाएवढे आहे. हा एक आजार आहे. त्याला प्रेडरविली सिंड्रोम असे म्हटले जाते. अशा मुलाचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर त्याला दररोज एक महागडे इंजेक्शन द्यावे लागते. हा आजार आणि हे इंजेक्शन फार दुर्मिळ असल्याने ते फार महाग आहे. म्हणून त्याला द्याव्या लागणार्‍या इंजेक्शनचा खर्च त्याच्या आईवडिलांना परवडत नाही. ते फार गरीब आहेत. आता त्यांनी या मुलाच्या मदतीसाठी निधी जमवायला सुरूवात केली आहे. औषधे तर खर्चिक आहेतच पण त्याचे कपडेही फार महाग पडत आहेत. तेही त्यांना परवडत नाहीत.

Leave a Comment