हुंड्याचे फायदे (?)


आपल्या समाजावर हुंडा नावाचा कलंक लागलेला आहे. मुलीने विवाह होऊन सासरी येताना माहेरहून भरपूर हुंडा आणावा अशी सासरच्या मंडळीची अपेक्षा असते एखाद्या मुलीला ते शक्य झाले नाही तर तिचा सासरी छळ केला जातो. काही मुलींच्या हत्याही होतात. देशात दररोज सरासरी २१ मुलींचे बळी असे पडतात. १९६१ साली देशात हुंडा देणे आणि घेणे हे दोन्हीही अपराध ठरवणारा कायदा झाला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कायदा असूनही हुंडा देणे आणि घेणे जारी आहेच पण उलट ते वाढत चालले आहे. याचे कारण असे आहे की, समाजात हुंडा पद्धतीचे समर्थन करणारा एक वर्ग आहे. तसा तो नसता तर हुंडा पद्धती बंद झाली असती आणि सरकारला याबाबत कसलाही कायदा करण्याची गरजही पडली नसती.

अर्थात हा वर्ग समाजात आहे हे कटू सत्य मान्य करतानाच या वर्गाच्या विचारांचा प्रसार होऊ नये असाच प्रयत्न झाला पाहिजे. पण बंगळूरच्या एका महाविद्यालयात बी. ए.च्या समाजशास्त्राच्या पुस्तकात हुंडा पद्धतीचे समर्थन करणारे लोक ते कोणत्या मुद्यांच्या आधारे करीत असतात याची माहिती देताना, चक्क हुुंडा पद्धतीचे फायदे समजून देण्यात आले आहेत. एखाद्या कुरूप मुलीचे लग्न होत नसेल तर एखाद्या मुलाला भरपूर हुंडा देऊन तिच्याशी लग्न करायला उद्युक्त करता येते हा हुंड्याचा फायदाच आहे असे या प्रकरणात म्हटले आहे. एवढा लाभ देऊन प्रकरण थांबत नाही. त्याशिवाय आणखीही काही फायदे दिले आहेत.

एखादा मुलगा गरीब असेल आणि त्याची उच्च शिक्षण घेण्याची ऐपत नसेल तर त्याच्यासाठी हुंडा हे एक आकर्षण ठरते. तो हुंडा देण्याची क्षमता असलेल्या बापाच्या मुलीशी विवाह करायला तयार झाला तर त्या बदल्यात त्याच्या उच्च शिक्षणाचा खर्च तो बाप करू शकेल. यातून ती मुलगीही उजवली जाईल आणि मुलालाही फायदा होईल. असे इतरही काही फायदे सांगितले आहेत. खरे तर या लेखकाला हुंड्याचे फायदे सांंगायचे नव्हते. हुंड्याचे समर्थक कसा विचार करीत असतात हे सांगण्यासाठी त्याने हे फायदे लिहिले आहेत आणि नंतर हे विचार कसे चुकीचे आहेत हेही नमूद केले आहे. पण या कॉलेजच्या काही मुलांनी हुंडा पद्धतीचे फायदे सांगणार्‍या पानाची झेरॉक्स प्रत काढली आणि त्याच्या अनेक प्रती काढून कॉलेजात वाटल्या. त्यातून गोंधळ झाला. कोणतेही क्रमिक पुस्तक काढणे हे किती नाजूक प्रकरण झाले आहे हे या प्रकरणावरून दिसून येते.

Leave a Comment