अजून जातीची मिठी सुटत नाही


भारतात जातीयवाद फार मोठ्या प्रमाणावर आहेेच पण निदान पुढची पिढी तरी या जातीच्या रिंगणाबाहेर येईल म्हणून आपण बरीच प्रतीक्षा करत होतो. मात्र याही पिढीच्या जातीय भावना फार सैल व्हायला तयार नाहीत असे दिसत आहे. हिंदुस्तान टाइम्सने देशातल्या तरुण पिढीचे अनेक विषयावरील मते जाणून घेतले तेव्हा याही पिढीची उडी जातीच्या मर्यादेच्या फार बाहेर पडणार नाही असे दिसत आहे. काही तरुण आणि तरुणींना याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला जी उत्तरे मिळाली त्यातून बहुसंख्य मुले आणि मुली जातीच्या बेड्या तोडण्याची हिंमत करत नाहीत असे दिसून आले. जी गोष्ट जातीची तीच धर्माची.

६८ टक्के तरुणांनी आपल्याला कोर्टात जाऊन नांेंदणी पद्धतीने विवाह करण्यापेक्षा धार्मिक विधी करणे आवडेल असे म्हटले आहे. म्हणजे तीन मुला-मुलींत केवळ एक जणच विवाहाच्या निरर्थक विधींच्या विरोधान बंड करायला तयार आहेत. विवाह ठरवण्याच्या बाबतीत मात्र थोडी प्रगती झाली आहे. ४५ टक्के मुला मुलींनी आपले पालक निवडतील तो जोडीदार मान्य करणार असल्याचे म्हटले आहे. पण ५५ टक्के मुला मुलींना आपला जोडीदार आपणच निवडणे आवडतेे. याबाबत मात्र बहुमत प्रेमविवाहाच्या बाजूने आहे. आजची तरुण पिढी आपल्या जातीबाबत व्यर्थ अभीमान बाळगत नाही पण विवाहाचा विषय येतो तेव्हा मात्र त्यांना जातच लागते. ६० टक्के मुला मुलींनी लग्न करताना जातीचा आणि धर्माचा विचार करणार असल्याचे म्हटले आहेच पण आंतरजातीय विवाहाबाबत त्यांची काही प्रतिकूल मते आहेत. ४० टक्क्यांना मात्र आंतरजातीय विवाह करण्यात काही अडचण वाटत नाही.

ज्यांना जातीबाहेर विवाह करणे पसंत नाही त्यांनी याबाबत आपल्या कुटुंबातल्या अडचणी सांगितल्या. आपला विवाह होतो तेव्हा दोन कुटुंबांचा संबंध जोडला जातो मग तिथे जात, पंथ, पत्रिका आणि सांस्कृतिक पातळी एक असणे या गोष्टी अपरिहार्य ठरतात असे त्यांचे म्हणणे आहे. आपल्याला लग्न करून घरच्या लोकांना नाराज करता कामा नये असे त्यांना वाटते. जातीची भावना कमी करण्यासाठी सर्वांनी निदान एखादा तरी मित्र किंवा मैत्रिण जातीबाहेरची करावी अशी अनेकदा अपेक्षा व्यक्त केली जाते पण याबाबतही जातीचे बंधन ओलांडण्याची सगळ्या मुला मुलींची इच्छा नाही. पाहणी केलेल्या मुला मुलींपैकी ४८ टक्के मुला मुलींना जातीबाहेरचे मित्र आहेत पण ५२ टक्के मुला मुलींनी जातीबाहेर मित्र आणि मैत्रिणी करायचेही धाडस केलेले नाही.

Leave a Comment