त्यांनी हुंडा परत केला


आपल्या देशात लग्न करताना हुंडा देणे किंवा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. देशातले काही कायदे करण्यात आले आहेत पण ते केवळ कागदावर आहेत. तसाच हुंडाविरोधी कायदाही कागदावर आहे. देशातले एखादा टक्का विवाह वगळता बहुतेक विवाह हे हुंड्याची सर्रास देवाण घेवाण करून होत असतात. पण एवढे उघडपणाने हा बेकायदा व्यवहार होत असूनही आजपर्यंत या देशात या हुंडा दिला किेंवा घेतला गेल्याचा एकही गुन्हा दखल झालेला नाही आणि आजवर कोणी हुंडापती तुरुंगात गेेलेला नाही. ही एक मोठी विसंगती आहे. ती कमी करण्यासाठी आपल्याला समाजात जागृती करायला हवी. अशा जागृतीचा काही परिणाम होणार नाही असे वरकरणी वाटते पण काहीवेळा अपवादात्मक घटना घडतात आणि एखादे कुटुंब हुंडा न घेता विवाह करून दाखवतेच.

बिहारच्या आरा जिल्ह्यातल्या हरिंदासिग या निवृत्त हेडमास्तरनी आपल्या मुलाचा विवाह ठरवताना घेतलेला चार लाख रुपयांचा हुंडा चक्क वधुपक्षाकडे परत केला. या मुख्याध्यापकाने आपल्या मुलाचा विवाह ठरविला होता आणि वधुपक्षाकडून चार लाख रुपये आगाऊ रक्कम घेतली होती. हा विवाह येत्या डिसेंबरमध्ये होणार होता. नियोजित वर २५ वर्षीय प्रेम रंजन सिंग हा वीजेच्या सामानाचे दुकान चालवतो. पण त्याच्या लग्नात मोठा हुंडा मागण्यात आला होता. याच दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे दि. ४ ऑक्टोबर रोजी आरा येथे भाषण झाले. त्यांनी तरुणांना हुंडा पद्धतीला फाटा देऊन विवाह करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला निवृत्त मुख्याध्यापक असलेेले हरिंदरसिंग हे उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आवाहन शिरोधार्ह मानून आपल्या मुलाचा विवाह हुंडा न घेता करण्याचा निर्धार केला.

त्यांनी आपल्या घरी आल्यानंतर ते चार लाख रुपये घेतले आणि त्यांनी वधूपक्षाचे घर गाठले. आपण हुंडा म्हणून घेतलेली रक्कम परत करायला आलो आहोत असे त्यांनी आपल्या होणार्‍या व्याह्यांना सांगितले तेव्हा तो व्याही हादरले कारण हे पैसे परत करणे म्हणजे विवाह रद्द होणे आहे की काय असे त्यांना क्षणभर वाटले. पण हरिंदर सिंग यांनी खुलासा केला तेव्हा या व्याह्यांचा जीव भांड्यात तर पडलाच पण त्यांना आपल्या व्याह्यांचा अभिमानही वाटला. आपली मुलगी अशा उदात्त विचार करणार्‍या कुटुंबात जात आहे याचे आपल्याला समाधान वाटत आहे असे त्यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave a Comment