चौहान नंतर आता अनुपम खेर


केन्द्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या अखत्यारीतील फिल्म आणि टीव्ही इनिस्टट्यूट ऑफ इंडिया या संस्थेवर आता अनुपम खेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या आधी या पदावर गजेन्द्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांची ही नियुक्ती वादग्रस्त ठरली होती. कारण गजेन्द्र चौहान हे काही नावाजलेले अभिनेते किंवा दिग्दर्शक नाहीत. चौहान यांच्या नावावर दखल घ्यावी अशी एकच भूमिका होती. ती म्हणजे गाजलेल्या महाभारत मालिकेतली धृतराष्ट्राची. ही संस्था चित्रपट आणि टीव्हीचे शिक्षण देणारी संस्था असल्याने तिच्या अध्यक्षपदावर या क्षेत्रातल्या कोणा तरी नावाजलेल्या अभ्यासू माणसाची नियुक्ती होणे अपेक्षित होते.

चौहान हे काही त्या उंचीचे कलाकार नसल्याने विद्यार्थ्यांनी त्यांना विरोध केला आणि संप केला. सरकार संपापुढे नमले नाही पण नंतर काही दिवसांनी चौहान यांना मुदतपूर्व निवृत्त करण्यात आलेे. विद्यार्थ्यांचा विरोध हा केवळ पात्रतेवरून नव्हता तर चौहान हे रा. स्व. संघ आणि भाजपाच्या जवळचे असल्याने त्यांची नियुक्ती झाली याला त्यांचा विरोध होता. म्हणजे पात्रतेचा मुद्दा हा समोर दाखवायला होता. मुळात विरोध राजकीय होता. कारण तिथे शिकायला असलेले अनेक विद्यार्थी डाव्या चळवळीशी निगडित आहेत आणि त्यांचा संघ परिवारातल्या व्यक्तीच्या नियुक्तीला विरोध आहे. कारण तिथे संघाचा माणूस आला की या डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांची मनमानी चालणार नाही. मनमानी म्हणजे काही काही विद्यार्थी या संस्थेच्या वसतिगृहावर दहा दहा वर्षे अनाधिकाराने राहतात.

आता सरकारने या पदावर नामवंत चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांची नियुक्ती केली आहे. आता या डाव्या विचारांच्या हस्तकांना खेर यांच्या नियुक्तीला विरोेध करण्याची काही सोय राहिलेली नाही पण तरीही ही नियुक्तीची बातमी येताच काही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केलीच. कारण त्यांना या पदावर संघाचा माणूस नको आहे. खरे तर सरकारने गजेन्द्र चौहान यांची नेमणूक करतानाच अनुपम खेर यांच्या नावाचा विचार करायला हवा होता. तेव्हाच या उपद्व्यापी विद्यार्थी नेत्यांना नेमणुकीचे राजकारण करता आले नसते. एकुण संघ परिवाराच्या हातात सत्ता आली आहे पण निरनिराळ्या संस्थांत संघाची माणसे नेमण्याचा प्रयत्न केला तरीही तेवढी अनेक क्षेत्रातली तज्ज्ञ माणसेही संघाजवळ नाहीत. संघातला हा माणसाचा तुटवडाच त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना खाद्य पुरवीत आहे.

Leave a Comment