चित्रपटसृष्टीतला चमत्कार


अमिताभ बच्चन हे नाव १९७० च्या दशकात हळूच पुढे आले. तेव्हा आपल्या देशातल्या चित्रपट रसिकांच्या अभिनयाच्या काही कल्पना तयार झालेल्या होत्या पण अमिताभ बच्चन यांनी नवी संकल्पना पुढे आणली आणि ती रूढ केली. नंतर तर त्यांनी इतिहासच घडवला. अमिताभ बच्चन यांच्या वयाला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचे जीवन आणि कामगिरी यांच्याकडे पाहिले तर ते जीवन नसून एक चमत्कार आहे असे वाटते. या चमत्कारात अभिनय हा मध्यवर्ती असला तरीही त्यांनी जीवनभर केलेला संघर्षही दुर्लक्षिता येणार नाही इतका तो जबर आहे. आज अमिताभ बच्चन हे कीर्तीच्या शिखरावर आहेत पण तिथपर्यंत वाटचाल करताना त्यांनी अनेक अपयशे पचवलेली आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे.

अमिताभ बच्चन यांनी एबीसीएल नावाची कंपनी काढली होती. ती केवळ तोट्यातच आली असे नाही तर तिच्यासाठी काढलेल्या कर्जाची परतफेडही होऊ शकली नाही. त्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने त्यांच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव करण्याची नोटीस दिली होती. चित्रपट सृष्टीत बराच पैसा आणि ख्याती कमावल्यानंतर आलेली ही आपत्ती होती. माणसाचे जीवन हे चढ आणि उतार यांची कहाणी असते हे म्हणणे सोपे आहे पण एवढा उतार आला असतानाही तो सहन करून आपल्या गुणवत्तेच्या जोरावर पुन्हा शिखरावर चढणे हे म्हणावे तेवढे सोपे नसते. माणसाला सतत यशच मिळू नये असे म्हटले जाते कारण सतत यश मिळायला लागले की माणूस उर्मट आणि गर्विष्ठ होतो.

यशाच्या वाटचालीत अधुन मधुन अपयशाचे फटके बसले म्हणजे माणसाचे पाय जमिनीला टेकतात आणि तो नम्र होतो. अमिताभ बच्चन मुळातच सुसंस्कृत आणि विनयशील आहेत त्यातच त्यांनी जीवनातले अनेक चटके सहन केले असल्याने ते अधिकच शालीन झाले आहेत. कौन बनेगा करोडपती या त्यांच्या कार्यक्रमात त्यांच्या या स्वभावाचा चांगलाच अनुभव येतो. तसा कोणताही कलाकार केवळ लेखकांनी लिहून दिलेले संवाद साभिनय सादर करीत असतो पण त्याच्या चाहत्यांना त्याचे स्वत:चे मनोगत कधी ऐकायला मिळत नाही. करोडपतीमध्ये अमितात्र बच्चन यांचे मनोगत ऐकायला मिळते आणि त्यांच्या चाहत्यांना एक वेगळाच आनंद होतो. या कार्यक्रमात त्यांना अनेक प्रकारच्या लोकांशी बोलावे लागते पण ते कोणाशीही आपल्या मोठेपणाच्या तोर्‍यात बोलत नाहीत. हा फार मोठा गुण आहे. तो मोठ्या परिपक्वतेतून आलेला आहे.

Leave a Comment