गुजरातची सत्त्वपरीक्षा


गुजरात विधानसभेची निवडणूक डिसेंबर अखेर होईल असे निवडणूक आयोगाने अनौपचारिकपणे जाहीर केले आहे. तारखा आणि नेमकी किती टप्प्यात निवडणूक होणार याचे तपशील आयोगाने जाहीर केलेले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी करण्यावर विचार सुरू आहे पण आता गुजरात विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे होणार असे जाहीर झालेले आहे याचा अर्थ एकत्रित निवडणुका घेण्याबाबत कसलाच ठाम विचार अजून झालेला नाही. २०१९ साली होणार असलेल्या लोकसभेच्या निवडणुकात भाजपाला बहुमत मिळेल की नाही याची परीक्षा गुजरातेत होणार आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी गुजरातेत निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच प्रचाराचा धुमधडाका सुरू केलेला आहे. दोन्ही मुख्य पक्षांनी राज्यातले वातावरण ढवळून काढले आहे. गुजरातेत २७ वर्षांपासून ते भाजपा सत्तेवर आहे. काही लोक या प्रदीर्घ कारकीर्दीचे श्रेय एकट्या मोदींना देतात. पण तशी काही स्थिती नाही. मोदी पंतप्रधान होण्याच्या आधीही जवळपास आठ वर्षे गुजरातच्या सत्तेची सूत्रे भाजपाच्याच हातात होती.

१९८९ पासून भाजपाच्या हातात सत्ता आहे. मोदी २००१ साली मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सलग तीन निवडणुका जिंकल्या गेल्या. देशभरात कॉंग्रेस पक्ष प्रभावी असण्याच्या काळात गुजरात हे कॉंग्रेसचे वर्चस्व असलेले राज्य होते. पण आणीबाणी नंतर ते कमी अधिक प्रमाणात कॉंग्रेसच्या हातून निसटले. आता २७ वर्षांपासून भाजपाच्या हातात सत्ता आहे. मोदी यांना या कालावधीतल्या गेल्या १५ वर्षांचे श्रेय मात्र जरूर दिले पाहिजे. त्यांनी राज्यात संघटना मजबूत केली आहे आणि सर्वांनी कौतुक करावे अशी कामे केली आहेत. तिथे भाजपाच्या हाती सत्ता टिकण्याचे श्रेय जातीय दंगलींना देण्याची रीत आहे. पण जातीय दंगलींचा प्रभाव असा एवढा काळ टिकत नसतो. भाजपाच्या तीन दशकांच्या सत्तेची अन्य काही कारणे आहेतच पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आणीबाणीनंतर या राज्यात कॉंग्रेसविरुद्ध वातावरण तयार झाले आहे आणि हे राज्य आता कायम कॉंग्रेस विरोधक होऊन बसले आहे. असे का झाले याचा तपास कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला पाहिजे. भाजपाचा हा प्रभाव मोदी पंतप्रधान झाल्यानंतरही टिकला आहे की नाही याचा अंदाज आता येत्या विधानसभा निवडणुकांत येणार आहे.

मोदीच्या राज्यात नसण्याच्या काळात दोन प्रमुख निवडणुका झाल्या. त्यातल्या महापालिकांच्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकांंत जनतेचा कौल नि:संदिग्धपणे भाजपाला मिळाला पण जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत कॉंग्रेसने काही ठिकाणी पाणी तोडले आहे. म्हणजे भाजपाला कॉंग्रेसने निर्णायक विजय मिळवू दिलेला नाही. गुजरात हा आताच कॉंग्रेसमुक्त होत नाही असे दाखवणारा हा निकाल होता. त्यामुळेच राहुल गांधी यांचा हुरूप वाढला आहे. आपण काही ना काही प्रमाणात आपले अस्तित्व दाखवून देऊ शकतो अशी त्यांना आशा वाटावी अशी ही स्थिती होती. म्हणूनच त्यांच्या प्रचार सभांत काही प्रमाणात जोश आणि आत्मविश्‍वास दिसायला लागला आहे. विकास वेडा झाला आहे ही घोषणा त्यांनी चांगलीच लोकप्रिय केली आहे. मोदी आणि भाजपाचे नेते फसव्या घोषणा करतात अशी भावना लोकांत निर्माण करण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे पण शेवटी भाषणात त्यांनी काहीही सांगितले तरीही गेल्या महिन्याभरात भाजपाने गुजरातेत दर आठवड्याला एका तरी मोठ्या प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. नर्मदा नदीवरील जगातल्या दुसर्‍या क्रमांकाच्या धरणाचा लोकार्पण सोहळा याच काळात झाला. विकास वेडा झाला असला तरीही धरण ही वस्तुस्थिती असते.

राहुल गांधी यांच्या प्रचार सभांत त्यांना मिळणारा प्रतिसाद मोठा उत्साहजनक आहे त्यामुळे भाजपाचे नेते अस्वस्थ झाले आहेत असे काही कथित नि:पक्षपाती लोक म्हणत आहेत पण अशी चर्चा सुरू असतानाच मोदी आपल्या वडनगर या जन्मगावी आले तेव्हा त्यांचे झालेले भव्य स्वागत कॉंग्रेस नेत्यांना अस्वस्थ करणारे होते. प्रचाराच्या पातळीवर मात्र राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. तरुणांचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय रोजगार हा असतो आणि या मुद्यावरच राहुल गांधी भर देत आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणाला प्रतिसाद मिळत आहे हे खरे पण शेवटी हा प्रतिसाद नेमका कसा आहे याचा उलगडा मतदानातच होणार आहे. तो राज ठाकरे यांना मिळणार्‍या प्रतिसादासारखा असेल तर शेवटी भाजपाने केलेल्या विकासामुळे राहुल गांधी वेडा झाला असे म्हणण्याची वेळ येईल. तसे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जनतेच्या पातळीवर कॉंग्रेसचा विश्‍वास बळावत चालला असला तरीही संघटनात्मक पातळीवर कॉंग्रेसला धक्केच बसत आहेत. शंकरसिंग वाघेला यांनी पक्षत्याग करून पहिला धक्का दिला होता तसेच धक्के देण्याचे सत्र कॉंग्रेसच्या आमदारांनी सुरू ठेवले आहे. आमदार आणि काही प्रमुख नेते असे साधारण २० नेते कॉंग्रेसमधून बाहेर पडले आहेत. त्याचा परिणाम कॉंग्रेसवर होईल. आक्रमक झालेली कॉंग्रेस आणि आत्मविश्‍वास असलेला भारतीय जनता पार्टी हा पक्ष या दोघांतली ही लढत मोठी चुरशीची असेल यात काही शंका नाही.

Leave a Comment