दहशतवाद्यांचा कणा मोडतोय


गेल्या सात ते आठ महिन्यांपासून केन्द्र सरकारने आणि सुरक्षा यंत्रणांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाच्या विरोधात घेतलेल्या खंबीर भूमिकेची फळे मिळत आहेत. जानेवारीपासून १० ते १२ मोठे अतिरेकी ठार करण्यात यंत्रणंना यश आले आहे. दोन दिवसांपूर्वी जैशे महंमद या संघटनेचा म्होरक्या सुरक्षा जवान आणि पोलीस यांच्या संयुक्त मोहिमेत मारला गेला. तो या संघटनेचा उत्तर काश्मीर विभागाचा प्रमुख होता आणि त्याने राज्यात अगदी दक्षिण भागातही अनेक घातपाती कारवाया घडवून आणल्या होत्या. त्याचे नाव खलिद अहंमद असे असून तो मुळात पाकिस्तानचा नागरिक आहे. तो २००९ पासून काश्मीर खोर्‍यात कार्यरत होता. त्याच्या मारले जाण्याने या संघटनेचा मोठा आधार गेला असल्याचे मानले जात आहे.

खलिद अहंमद हा खलिद भाई म्हणून ओळखला जात होता आणि विशेषे करून पोलिसांवर केल्या जाणार्‍या हल्ल्यात तो सक्रिय असे. या आधी या संघटनेचा बुर्‍हान वाणी हा अतिरेकी मारला गेला होता आणि तो जेमतेम पंचवीशीत होता. तसाच खलिद हाही पंचवीस वर्षांच्या आसपास होता. तो तरुण मुलांची माथी भडकवून त्यांना जैशे महंमद या संघटनेत भरती करण्याचे काम करीत असे आणि जम्मू काश्मीर मध्ये त्याचे चांगले नेटवर्क होते. त्याचा वापर करून येत्या काही दिवसांत एक मोठा हल्०ला करण्याच्या प्रयत्नात तो होता. हा हल्ला श्रीनगर विमानतळावर किंवा लष्कराच्या मोठ्या तळावर करण्याची योजना तो आखत होता. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सरकार, लष्कर, आयएसआय, डी गँग हे सारे भारतात एखादा मोठा हल्ला करण्याच्या बेतात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खलिद हा काही जमवाजमव करीत होता असे गुप्तचर विभागाला आढळले.

या वर्षात सुरक्षा जवानांनी यमसदनाला पाठवलेल्या काही प्रमुख दहशतवाद्यात खलिदचा समावेश आहे. या दहशतवाद्यांत जैशे महंमद, लष्करे तैयबा, हिजबुल मुजाहेदीन या संघटनांचे समर्थक आणि नेते आहेत. त्यांच्या मारले जाण्याने दहशतवादी संघटनांच्या सहानुभूतीदारांत नैराश्याची भावना पसरली आहे. सरकारने अशा सहानुभूतदारांवर करडी नजर ठेवली असून त्यांच्या काळ्या पैशाचे स्रोत शोधायला सुरूवात केली आहे. ते आता सापडायला लागले आहेत. नोटाबंदीनंतर सरकारने दहशतवादी कारवाया कमी होतील असे म्हटले होते. त्याचा प्रत्यय येत आहे.

Leave a Comment