प्रदूषण आणि बुद्धिमत्ता


एका ख्यातनाम संस्थेने ग्रामीण, आदिवासी मुले आणि शहरातली मुले यांच्या बुद्धिमत्तेचा तौलनिक अभ्यास केला असता त्यांना शहरातली मुले तुलनेने शहाणी असल्याचे आढळले. ग्रामीण भागातली आणि त्यातल्या त्यात आदिवासी मुले त्यांच्या पेक्षा कमी हुशार आढळली. या संबंधात अधिक खोलवर अभ्यास केला असता असे दिसून आले की, शहरातल्या मुलांना टीव्ही, इंटरनेट, वृत्तपत्रे या माध्यमांचा लाभ अधिक होत असतो आणि त्यांच्यापर्यंत हजारो शब्द येऊन ते त्यांच्या कानावर पडत असतात. म्हणजे ती मुले शब्दांच्या सान्निध्यामुळे हुशार असतात. ग्रामीण आणि आदिवासी मुलांना माध्यमांचा एवढा सहवास मिळत नाही. मग तज्ज्ञांनी त्यांची शब्द विरहित चाचणी घेतली असता असे दिसून आले की शहरातली मुले तुलनेने कमी आकलन शक्तीची आहेत.

आदिवासी आणि ग्रामीण भागातली मुले जादा हुशार असतात आणि बुध्यांकाच्या मोजमापात ती आघाडीवर असल्याचा अनुभवही येतो. म्हणून स्पर्धा परीक्षांत ती शहरातल्या मुलांच्याही पुढे आहेत. याची कारणे शोधली असता असे दिसून येते की खेड्यातली हवा मोकळी असते आणि तिच्यात कसलेही प्रदूषण होत नाही. तिच्यात प्राणवायू खूप असतो. विषारी वायू नसतात. त्यामुळे गावातल्या मुलांची बुद्धी आणि स्मरणशक्ती जास्त असतेे. शहरातल्या हवेत प्राणवायू कमी आणि विषारी वायू जास्त असतात. कारण शहरात कारखाने असतात. वाहने असतात. घराघरात फ्रिज असतात. शिवाय ए.सी. असतात. त्यामुळे मुलांच्या मेंदूला शुद्ध हवाच मिळत नाही. परिणामी बुद्धिमत्तेवर परिणाम होतो. प्रदूषणाने स्मरणशक्ती कमी होते.

अर्थात ही तुलना आपण आजवर अंदाजाने करीत होतो पण आता स्पेनमधील संशोधकांनी प्रदूषणाचा मुलांच्या मेंदूवर आणि स्मरणशक्तीवर नेमका काय परिणाम होतो याचा सूक्ष्म आणि नेमका अभ्यास केला असून प्रदूषित हवेतले नेमके कोणते घटक स्मरणशक्तीवर नेमका कसा परिणाम करत असतात याचे संशोधन केले आहे. शाळांत जाणार्‍या १२०० मुलांना या प्रयोगात आणि संशोधनात गुंतवले गेले आणि त्यांना शाळेत सोडणार्‍या वाहनांचाही विचार केला. तेव्हा असे आढळले की वैयक्तिक मालकीच्या वाहनातून जाणार्‍या मुलांना हवेतल्या काही विशिष्ट प्रदूषक द्रव्यांचा परिणाम जाणवतो. बसने जाणार्‍या मुलांना ती द्रव्ये मुळे श्‍वसनातून घ्यावी लागत नाहीत. त्यांची स्मरणशक्ती त्या मानाने चांगली असते.

Leave a Comment