गोध्रा हत्याकांडातील आरोपींना दिलासा


गुजरातेत २००२ साली झालेली जातीय दंगल ज्या गोध्रा हत्याकांडामुळे घडले त्या हत्याकांडातील फाशीची सजा सुनावण्यात आलेल्या आरोपींची फाशीची शिक्षा गुजरात उच्च न्यायालयाने कमी करून त्यांना आता जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात ११ जणांना विशेष न्यायालयाने फाशीची सजा सुनावली होती. जन्मठेपेबाबत नेहमीच वाद होत असतो. जुन्या कायद्यात जन्मठेपेचा अर्थ १२ वर्षे तुरुंगात असा होता पण आता न्यायालयाने स्पष्ट केले असून या आरोपींना आता फाशीची शिक्षा न होता मरेपर्यंत कारागृहात रहावे लागेल. विशेष न्यायालयाने आपला फाशीच्या शिक्षेचा निकाल २०११ साली एक मार्चला दिला होता. या न्यायालयाने ११ जणांना फाशी तर २० जणांना जन्मठेप सुनावली होती.

यातल्या फाशीची शिक्षा झालेल्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला असला तरी जन्मठेपेची सजा झालेल्या २० जणांची जन्मठेपेची शिक्षा आहे तशीच ठेवली आहे. विशेष न्यायालयाने ६२ आरोपींना निर्दोष सोडले होते. त्यांच्याही बाबतीत उच्च न्यायालयाने खालच्या कोर्टाचा निकाल कायम टिकवला. म्हणजे या गाजलेल्या प्रकरणात खालच्या न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयात जवळपास आहे तसाच राहिला आहे. केवळ ११ जणांची फाशीची शिक्षा सौम्य झाली आहे. अर्थात आपण तिला सौम्य म्हणत असलो तरी काही वेळा आरोपी तुरुंगातला एकांतवासाला एवढा कंटाळलेला असतो की त्याला या एकांतवासापेक्षा मरण बरे वाटायला लागते कारण फाशीत एकदाच मरावे लागते पण जन्मठेपेत नेहमी मरावे लागते.

हे जळीत कांड मोठे ऐतिहसिक आहे कारण त्यात अयोध्येतून राममंदिराची कारसेवा करून साबरमती एक्सप्रेसने परतणारे ५६ कारसेवक जळून मरण पावले होते. या गाडीच्या एस ६ या डब्याचे सारे दरवाजे बंद करून त्याला आग लावण्यात आले होते. त्यामुळे हे कारसेवक फार वाईट पद्धतीने मरण पावले होते. त्यातूनच मग गुजरातेत दंगली झाल्या. मुळात हेे डबे जाळण्यात आले नव्हते तर अपघाताने पेटले होते असा जावईशोध काही लोेकांनी लावला होता. म्हणजे या अपघाताचे निमित्त करून हिंदुत्ववादी संघटनांना दंगली पेटवायच्या होत्या आणि त्यांनीच या अपघाताला जळीतकांंडाचे रूप दिले आणि दंगली पेटवल्या असे त्यांचे म्हणणे होते पण विशेष न्यायायानेही कधी या म्हणण्यावर विश्‍वास ठेवलेला नाही आणि उच्च न्यायालयानेही त्याला दुजोरा दिलेला नाही. हा प्रकार काही दंगेखोरांनीच केलेला आहे.

Leave a Comment