चीनमध्ये गाढवांना प्रचंड मागणी


चीनमध्ये गाढवांना प्रचंड मागणी असून चीन सरकार गाढवे आयात करत आहे. मात्र चीनची ही आयात इतकी प्रचंड आहे की त्यामुळे अफ्रिकी देशांसह अनेक देशांत गाढवांची संख्या कमी होऊ लागल्याने तेथील सरकारांनी गाढवे निर्यातीवर बंदी घातली आहे. चीनमध्ये गाढवाच्या चामड्यापासून जिलेटीन हे सुपरफूड बनविले जाते तसेच अनेक पारंपारिक औषधांत गाढवाचा वापर केला जातो. चीनमध्ये गाढवांच्या मांसालाही मोठी मागणी आहे.

ब्रिटनमधील चॅरिटी संस्था डाँकी सेंक्चुरीच्या आकडेवारीनुसार चीनमध्ये गाढवे मोठ्या प्रमाणावर मारली जातात. त्यामुळे १९९० मध्ये असलेली गाढवांची ११६ लाख संख्या घटून आता ३० लाखांवर आली आहे. गाढवांची कातडी उकळवून त्यापासून बनविले जाणारे सुपरफूड जिलेटिन २५३९० रूपये किलाने विकले जाते.चीन आफ्रिकी देशांतून गाढवांची आयात करतो मात्र येथील गरीब जनतेचे गाढव हे वाहतूक तसेच शेतीकामाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे तेथे गाढवांच्या चोर्‍या वाढल्या आहेत व गरीबांना गाढव चोरीला गेले तर नवीन घेणे शक्य होत नाही कारण गाढवाच्या किंमतीही तेथे तुफान वाढल्या आहेत.

चॅरिटी संस्था डाँकी संक्चुरीच्या म्हणण्यानुसार चीनमध्ये दरवर्षी १८ लाख गाढवे आयात केली जातात व प्रत्यक्षात मागणी १०० लाख गाढवांची आहे. अर्थात चीनच्या या प्रचंड भुकेमुळे अन्य देशांना मोठी अडचण आली आहे. त्यामुळे युगांडा, नायजेरिया,टांझानिया, बोत्सवाना, बुर्कीनो, फासो, माली, सेनेगल या देशांनी चीनला गाढवे विकण्यावर बंदी घातली आहे. गाढवाची कातडी लवकर मिळावी म्हणून त्याला उपाशी ठेवून मारले जाते अथवा डोक्यावर जखम करून मारले जाते असेही या संस्थेचे म्हणणे आहे. अफ्रिकेतील १२ देशांनी गाढवांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

Leave a Comment