वर्कोहोलिक जपानी महिला


जपानवर अणुबॉंब टाकला गेला आणि दुसर्‍या महायुद्धाचा अंत झाला पण या बॉंबने जपान बेचिराख झाला. नंतर तो राखेतून उठून झेप घेणार्‍या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे बरबादीतून समृद्ध झाला. अर्थात त्याचे श्रेय तिथल्या कामगारांना आहे कारण जपानी कामगार कधीच कामचुकारपणा करीत नाहीत. ते फार कष्टाळू असतात. त्यांना संप करायचा झाला तर ते काम थांबवून संप करीत नाहीत तर जादा काम करून मालकापर्यंत आपला असंतोष पोचवतात. जादा दारू पिणारांना अल्कोहोलिक म्हणतात तसे जादा काम करणारांना वर्कोहोलिक म्हटले जाते. जपानी माणसे विशेषत: जपानी महिला फार वर्कोहोलिक आहेत कारण त्या कारखान्यात जादा काम करूनही पुन्हा घरकाम टाळत नाहीत.

आता मात्र जपानी महिलांना हे जादा काम सहन होईनासे झाले आहे आणि अनेक महिला जादा कामाचा ताण सहन न होऊन आत्महत्या करायला लागल्या आहेत. सध्या जपानमध्ये या आत्महत्यांचीच चर्चा जोरदारपणे सुरू आहे. २०१५ -२०१६ या वर्षात जपानमध्ये जादा कामाचा ताण सहन न झालेल्या दोन हजार कामगारांनी आत्महत्या केल्या असल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रीय कामगार आयोगाने या आत्महत्यां विषयी चिंता व्यक्त केली आहेच पण जपान मधील २० टक्के कामगार कोणत्याही क्षणी कामाचा ताण असह्य होऊन आत्महत्या करण्याची शक्यता असते असे म्हटले आहे. कारण तिथले कामगार दररोज आठ तासाची ड्युटी करूनही तीन ते चार तास ओव्हरटाईम करतात. म्हणजे सरासरी ११ ते १२ तास काम करीत असतात.

जपानच्या कामगारांचे कामही मोठे प्रामाणिकपणाने केलेले असते. त्यात कामचुकारपणा नसतो. ते फार रजाही घेत नाहीत. २०१५ साली असे आढळले होते की, जपानमधील कामगार वर्षाला केवळ ९ दिवस रजा घेतात. त्यांच्या या कामामागे आपला देश उत्पादनात पुढे गेला पाहिजे ही राष्ट्रभक्तीची भावना असते पण ती भावना अनावश्यक आणि जीवघेणी असते म्हणून सरकारने ओव्हरटाईमवर अनेक बंधने घातली आहेत. एखाद्या कामगाराकडून महिन्यात १०० तासापेक्षा अधिक ओव्हरटाईम करून घेतल्यास कारखानदाराला दंड केला जातो. अर्थात तरीही १०० दिवस म्हणजे दररोज चार तास ओव्हरटाईम. एवढा ओव्हरटाईम झाल्यावर माणूस तणावाखाली येईल नाही तर काय होईल ? महिला तर एवढी कामे करून घरी येतात आणि पुन्हा घरकामाला लागतात.

Leave a Comment