पुन्हा एकदा दाऊद


१९९३ साली मुंबईत मोठी बॉंबस्फोटाची मालिका घडवून भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला मोठे आव्हान देणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याने त्याच मालिकेची पुनरावृत्ती करण्याचा कट रचला असल्याचे वृत्त एक वृत्त वाहिनीने दिले आहे. ही बातमी खरी असावी असे काही संकेत मिळाले आहेतच पण त्याला पुन्हा एकदा असे करावे वाटावे अशी स्थितीही आहे. अर्थात त्याला ही गोष्ट शक्य होणार नाही कारण आता आता आपल्या सुरक्षा व्यवस्था आणि गुप्तचर यंत्रणा फार सजग झाल्या आहेत. दाऊद इब्राहिम हा आपल्या देशातला बातमीचा सर्वात मोठा विषय झालेला आहे. कारण तो कराचीत राहून मुंबईतले आपले सारे साम्राज्य हाताळतो आहे. त्याचे हे कौशल्य देशाच्या आणि समाजाच्या हिताच्या विरोधात आहे पण त्याचे कौशल्य कोणालाही चकित करणारे आहे. विशेषत: तो मुंबईत आपल्याला हवे ते घडवून आणण्यास समर्थ आहे कारण त्याने आपली माणसे मुंबई पोलिसांतही पेरलेली आहेत. तेव्हा आपल्या यंत्रणेतले अधिकारी कितीही हुशार असले तरीही या पेरलेल्या हस्तकांपुढे ते नामोहरम होतात.

त्याची ही जमेची बाजू असल्याने तो पुन्हा एकदा असा स्फोट घडवण्याचे कारस्थान रचू शकतो. तो तसा पोलिसांना चकवूही शकतो. दाऊद स्फोट घडवणार म्हणजे ते मुंबईतच घडवणार असे मानून पोलीस मुंबईतली सुरक्षा व्यवस्था कडक करायला जातील आणि दाऊदचा नवा स्फोट अन्य कोठे तरी होईल. तो अशा कारस्थानात गुंतला असल्याचे वृत्त आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून दाऊदच्या संबंधात काही वेगळयाच चर्चा सुरू होत्या. तो शरण येणार आहे असेही काही लोक बोलत होते. महाराष्ट्राचे थोर नेते राज ठाकरे यांनी तर दाऊद शरण येणार आणि नरेन्द्र मोेदी हे त्याला आपणच अटक करून आणले अशी शेखी मिरवणार असे आगाऊच जाहीर केले होते. दाऊद शरण येण्याच्या आधीच त्यावर मोदी काय करणार याची माहिती देणारे राज ठाकरे यांचे हेेरखाते खरेच गौरवास पात्र आहे. पण आता टाइम्स नाऊला मिळालेली नव्या स्फोटाच्या तयारीची माहिती वेगळी आहे. अर्थात दाऊदला यासाठी पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनांनी तगादा लावला असण्याची शक्यता जास्त आहे. यालाही काही कारणे आहेत. या दहशतवादी संघटना सध्या फार निराश झाल्या आहेत. कारण नरेन्द्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्या कारवाया थंड पडल्या आहेत. या संघटनांनी भारत-पाक सीमेवर मोठ्या प्रमाणावर घुसखोरीचे प्रयत्न केले पण ते सारे प्रयत्न भारतीय सेनेने हाणून पाडले.

तसे पाक सैन्याने आणि पाक अतिरेक्यांनी घुसखोरी करण्याचे प्रयत्न अनेकदा केले आहेत पण त्यांना सीमेवर प्रथमच चोख उत्तर मिळत आहे. गेल्या तीन वर्षात भारताच्या सुरक्षा व्यवस्थांकडून सर्वाधिक अतिरेकी मारले गेले आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानचे सरकार यांना एकाकी पाडण्यात भारताला यश आले आहे. प्रत्यक्ष रणांगणावर आणि जागतिक पातळीवर अशा दोन्ही स्तरांवर भारताने पाकिस्तान आणि त्यांच्या दहशतवादी संघटना यांच्यावर मात केली आहे. त्यामुळे या संघटना नाउमेद झाल्या आहेत. एवढेच नाही तर पाकिस्तानला आणखी एका विभाजनाचे वेध लागले असून त्या देशातून वेगळे होणार्‍या बलुचिस्तानला भारतासह अनेक देशांचे सहकार्य मिळत आहे. पाकिस्तानचे आणखी दोन तुकडे पडणे हे आता अटळ आहे असे मानले जात आहे. गेल्या तीन वर्षात घडलेली एक मोठी गोष्ट म्हणजे पाकिस्तानला आणि त्यांच्या समर्थनाने काम करणार्‍या संघटनांनी सीमेवर कितीही गोंधळ घातला असला तरीही भारताच्या अंतर्गत भागात एकदाही घातपाती घटना करता आलेली नाही.

या सगळ्या घटना डी गँगला आणि पाकिस्तानलाही अस्वस्थ करणार्‍या आहेत. भारताची भरभराट होत आहे हेही त्यांच्या अस्वस्थतेचे आणखी एक कारण आहे. म्हणून चांगले नियोजन करून भारतात एखादी मोठी घातपाताची घटना घडवण्याची त्यांची तयारी होत आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे डी गँगच्या मुंबईतल्या साम्राज्याला धक्के बसत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईतले गँगस्टर खंडण्या वसूल करीत आले आहेत. त्यांच्या विरोधात कोणीही पोलिसांत जाण्याची हिंमत दाखवत नाही. दाखवण्याचा प्रयत्न केला तरीही प्राणास मुकावे लागते. त्यामुळे शहरात पोलीस असले तरीही कोणी तक्रार करीत नाही. दाऊदची अशी कोट्यवधी रुपयांची कमाई तो कराचीत असला तरीही जारी आहे. पण अलीकडे या साम्राज्याला तडे जायला लागले होते. व्यापारी खंडणीच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्याचे साहस करायला लागले होते आणि दाऊदच्या केवळ हस्तकांंनाच नाहीतर भावालाही अटक झाली होती. शिवाय दाऊदची ब्रिटनमधील मालमत्ता लिलावात विकली गेली आहे. एकंदरीत ही स्थिती त्याचा वचक कमी झाल्याची दर्शक आहे. त्यामुळे तो असहाय झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पास्किस्तान, तिथल्या दहशतवादी संघटना आणि डी गँग असे सारेच सध्या संपल्यात जमा होत आहेत. तेव्हा आपण अजून जिवंत आहोत हे त्यांना दाखवून द्यावे लागणार आहे तसे न केल्यास त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

Leave a Comment