साहित्यिक वादळ शमले


गेल्याच आठवड्यात अरुण साधू गेले आणि काल त्यांच्या पाठोपाठ साधारण त्याच पद्धतीचे पण थोडे वेगळे लेखन करणारा आणखी एक वादळी लेखक ह. मो. मराठे यांच्या रूपाने गेला. मराठी साहित्याला बसलेले हे दोन धक्के आहेत. ह. मो. मराठे यांचे बालकांड वाचल्यावर या दोघांतल्या एका साम्याचे दर्शन घडते. ह. मो. मराठे हे तळकोकणातल्या एका गावातल्या ब्राह्मण कुटुंबातून पुढे आले. मात्र साधू हे ठरवून पुण्यात आले होते आणि त्यांना साहित्या बरोबरच पत्रकारितेत करीयर करायचेे होते. मराठे तसे आले नाहीत. त्यांची स्थिती तशी बरी होती पण वडिलांच्या कोपिष्ट आणि हटवादी स्वभावामुळे या कुटुंबाची वाताहत झाली. ते वणवण करीत कोठे तरी नशीब काढू म्हणून पुण्यात आले.

त्यांचे बालकांड वाचणारांना याची माहिती आहे. त्यांनी आपले बालपण आणि नंतरची शिक्षणासाठीची पायपीट आपल्या आत्मकथनाच्या या पूर्वार्धात कथन केली आहे. नंतरचा भाग म्हणजे पोहरा. याही भागात त्यांनी आपल्या जीवनातले अनेक भेदक अनुभव कथन केले आहेत. पण ह. मो मराठे यांनी त्यांच्या जीवनातल्या काही अनुभवांना ललित साहित्यातून वाचा फोडली आहे. निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी हे त्यांचे नाटक १९६० च्या दशकातल्या सुशिक्षित बेकारांची व्यथा मांडणारे आहे. नोकरीसाठी भटकणार्‍या बेकारांच्या मनातल्या वादळच त्यांनी या नाटकात शब्दबद्ध केले आहे पण त्यातली तरुणांच्या मनातली शिवराळ पण उद्वेगातून निघालेली भाषा त्या काळच्या काही लोकांना मानवली नाही. नंतर तीच काही नाटकांची भाषा झाली.

काळेेशार पाणी ही ही कादंबरी कोकणातल्या एका देवाला वाहिलेल्या बाईची आणि तिच्या जीवनातला भुकेबरोबरच वासनेचाही आगडांंब थेटपणे मांडणारी होती. ती वादळी ठरली. पण ती वादळी ठरावी म्हणून लिहिलेली नव्हती तर ते वातावरण वास्तवात उभे करण्यासाठी लिहिलेली होती. मराठी साहित्यात श्‍लील आणि अश्‍लिलतेच्या कल्पनांवरून मोठी वादळे झाली आहेत आणि शमलीही आहेत. पण त्या वादळांचा केन्द्रबिंदू होण्याचा आणि नंतर तोच प्रवाह झाल्यावर त्याचा उद्गाता होण्याचा मान ह. मो.मराठे यांना मिळाला. त्यांचे साहित्यिक कर्तृत्व मोठे आहे. खरे तर त्यांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी पाहिल्यावर हे कर्तृत्व नवलाईचे ठरते. कारण लहान वयात त्यांना घराच्या बाहेर पडावे लागले तेव्हा त्यांना आपल्या कारवारी भाषेशिवाय दुसरी भाषाही बोलता येत नव्हती.

Leave a Comment