आशादायक अहवाल


खरे तर अर्थव्यवस्थेच्या वाटचालीत कमी अधिक होणारच. कधी तेजी तर कधी मंदी येणारच. पण या तेजी मंदीतून हाती येणार्‍याआकड्यातले आपल्या सोयीचे तेवढे आकडे हाती घेऊन सरकारच्या कामगिरीचे एकांगी विश्‍लेषण केले जाते. लोकशाहीत हे चालतच असते. राहुल गांधी तर हेच आकडे घेऊन अमेरिकेत गेले आणि तिथल्या लोकांसमोर मोठ्या आत्मविश्‍वासाने बोलले. तो आत्मविश्‍वास अज्ञानातून आलेला होता पण तेवढ्यवरूनच काही मोदी द्वेष्ट्यांना आनंदाचे एवढे भरते आले आहे की आता राहुल गांधी आता मोदींची पाठ लावायला सज्ज झाले आहेत असे मत मांडायला त्यांनी सुरूवातही केली. काही लोकांना तर एवढ्यावरूनच २०१९ च्या निवडणुकीचे निकालाचे आकडेही दिसायला लागले.

एवढा गदारोळ सुरू असतानाही पंतप्रधान मोदी शांत आहेत. कारण त्यांना हे माहीत आहे की एखादा असा एखादा आकडा समोर येणार आहे की ज्यामुळे या सगळ्या आगीवर पाणी पडणार आहे. आता तसे होतही आहे. पहिला आकडा येत आहे. ऑगष्ट महिन्यात गाभा क्षेत्रातल्या कामात पाच टक्के वाढ झाली आहे. गेल्या एप्रिलपासूनची ही सर्वात मोठी वाढ आहे. कोळसा, वीज, नैसर्गिक वायू या क्षेत्रातल्या वाढीच्या जोरावर ही वाढ नोंंदली गेली आहे. गेल्या वर्षीच्या ऑगष्टमध्ये हीच वाढ ३ टक्के एवढी नोंदली गेली होती. ती यंदा दोन टक्क्यांनी जास्त आहे. याच क्षेत्रातली गेल्या महिन्यातली म्हणजे जुलै २०१७ मधली वाढ २.७ टक्के एवढी होती ती महिनाभरात दोन टक्क्यांनी सुधारली आहे.

आता असाच आणखी एक आकडा आशा घेऊन आला आहे. तो आकडा आहे तेलाच्या वापराचा. सध्या जगात कच्च्या तेलाच्या वापराबाबत तीन देश आघाडीवर आहेत. अमेरिका, चीन आणि भारत. अमेरिका एकटी जगात तयार होणार्‍या तेलापैकी २३ टक्के तेल वापरते. चीन आठ टक्के तर भारत तीन ते चार टक्के. यामुळे हे तीन देश आघाडीचे तेलाचे ग्राहक ठरतात पण आता भारतातली तेलाची मागणी चीनपेक्षा अधिक गतीने वाढत आहे. चीनचा तेलाचा वापर दरसाल तीन ते चार टक्क्यांनी वाढत असतो पण गेल्या दोन वर्षात ही वाढ कमी झाली आहे. चीन दरसाल दोन ते तीन टक्के तेल वापर वाढवत आहे पण भारत मात्र सहा टक्क्यांनी मागणी वाढवत आहे. अशा गतीने वाढल्यास २०१८ साली भारत हा तेल ग्राहक म्हणून दुसर्‍या क्रमांकावर जाईल तर चीन तिसरा राहील.

Leave a Comment