हैदराबादेतील प्रलय


हैदराबाद शहराला गेल्या दोन दिवसात जबरदस्त पर्जन्यवृष्टीने मोठा तडाखा दिला. पावसाळा जवळ जवळ संपला असला तरीही अचानकपणे पाऊस सुरू झाला. अरबी समुद्रात काही वादळ निर्माण झाले आणि त्याचा परिणाम होऊन हैदराबादसह तेलंगणात मोठा पाऊस पडला. सार्‍या शहरात पाणीच पाणी झाले. या सगळ्या स्थितीचे वर्णन करणे मोठे कठीण आहे पण एका शब्दात सांगायचे तर हैदराबादची मुंबई होऊन गेली. आता या नैसर्गिक संकटाची जबाबदारी कोणाची यावर चर्चा सुरू आहे आणि ही आपत्ती मानव निर्मित असल्याचा दावा काही तज्ज्ञ मंडळी करीत आहेत. शहरात झालेली बेमुर्वत नागरी वस्ती आणि स्थानिक प्राधीकरणाला ती रोखण्यात आलेले अपयशच अशा संकटांना निमंत्रण देत असते असे या लोकांचे म्हणणे आहे.

मुंबई आणि बंगलोर याही शहरात अशी स्थिती येत असते. कारण या शहरांचा विकास ज्या गतीने झाला आहे त्या गतीने त्यातल्या नागरी सोयी त्यातल्या त्यात गटारींची व्यवस्था विकसित झालेली नाही. त्यामुळे पाणी तर खूप साचते पण ते वाहून जात नाही. तुंबते. गटारींनाच असा काही पूर येतो की मोठी मोठी वाहनेही अडतात. वाहतूक विस्कळीत होते. गटारींचा पूर पाहताना आपण नदीचाच पूर पहात आहोत की काय असे वाटते एवढे प्रचंड पाणी त्यातून वहात असते. ते अनेक दुकानांत शिरते. झोपडपट्टयांत शिरते. दुकानातल्या वस्तू वाहून जातात आणि ज्या वाहून जात नाहीत त्या दुकानातल्या पाण्यात तरंगत राहतात. कोट्यवधी रुपयांची हानी होते. या पुराला जबाबदार कोण याची कितीही चर्चा झाली आणि त्यातून काहीही निष्पन्न झाले तरीही नुकसान भरून येत नाही.

हैदराबादेत अशा प्रकारची आपत्ती गेल्याच वर्षी साधारण याच दिवसांत आली होती. त्यावेळीही अचानकपणे पाऊस पडला आणि शहरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. त्या प्रसंगीही ही आपत्ती कोणामुळे आली यावर वाद झडले होते. अर्थात त्याला कोणीही जबाबदार असले तरीही एक़दा आपत्ती आल्यानंतर सरकारने जागे होऊन अशी उपाय योजना केली पाहिजे की नंतर कधीही कितीही पाऊस आला तरीही एवढी मोठी हानी होणार नाही. मुंबईत २००५ साली अशीच आपत्ती आली होती आणि ती ऐतिहासिक ठरली होती. तशी काही हैदराबादवरील आपत्ती नव्हती. हैदराबादेत २००० सालच्या पावसाळ्यात अशी ऐतिहासिक म्हणता येईल अशी आपत्ती आली होती. तिची मात्र लोक अजूनही आठवण काढतात.

Leave a Comment