अमेरिकेतून तेलाची आयात


आजवर आपण अनेक गोष्टी अमेरिकेला निर्यातही केल्या आणि अमेरिकेतून त्यापेक्षा अधिक आयात केल्या आहेत. मात्र या आयात निर्यातीत इंधन तेलाचा म्हणजे डिझेलचा समावेश नव्हता. आता अमेरिकेतून तेलाची आयात सुरू झाली आहे. या आयात व्यापारातला पहिला हप्ता भारतात येऊन पोचला आहे. सरकारी मालकीच्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने मागविलेले १६ लाख बॅरल तेल ओडिशाच्या किनार्‍याला लागले आहे. ते अमेरिकेतून गेल्या १९ ऑगष्टला इकडे यायला निघाले होते. सध्या तरी भारतातल्या विविध तेल कंपन्यांनी अमेरिकेकडे ७८ लाख बॅरल तेलाची ऑर्डर नोंदवलेली असून काल आलेला त्यातला पहिला हप्ता आहे. आणखी काही हप्ते लवकरच येऊन पोचतील.

अमेरिकेचे तेल उत्पादन बरेच आहे पण अमेरिकेने ते कधी कोणाला निर्यात केले नव्हते. पूर्वी अमेरिकेतून तेल निर्यात होत होते पण १९७३ पासून ही निर्यात बंद करण्यात आली कारण आपल्याला बाहेरच्या देशातून जर स्वस्त तेल मिळत असेल तर आपले राखीव साठे आपण कशाला वापरायचे असा विचार अमेरिकेच्या सरकारने केला होता. मात्र आता हे धोरण बदलले आहे. भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी गेल्या जूनमध्ये अमेरिकेचा प्रवास केला तेव्हा या संबंधात करार केला होता. त्यानुसार ही आयात होत आहे. भारत हा जगातला तिसर्‍या क्रमांकाचा तेल वापरणारा देश असल्याने अमेरिकेसाठीच काय पण जगातल्या अनेक देशांसाठी हा देश म्हणजे मोठी बाजारपेठ आहे. अमेरिकेने त्याच हेतूने भारताला तेल पुरवण्याचा आणि आपले जुने धोरण बदलण्याचा निर्णय घेतला असावा.

या धोरण बदलण्यामागे काय कारण आहे हाही मोठा प्रश्‍न आहे. आपण फार पुढचा विचार करून साठे जतन केले आणि कालांतराने तेलाच्या इंधनाचे महत्त्चच कमी झाले तर हे साठे निरर्थक ठरतील. म्हणूनच जोपर्यंत तेलाचे महत्त्व आहे तोपर्यंत हे साठे वापरावेत आणि झालेच तर त्यापासून पैसाही कमवावा असा विचार त्यांनी केला असावा. आता भारताने हे तेल मागवण्याचे कारण काय ? भारताला अमेरिकेचे तेल आखातातल्या तेलापेक्षा स्वस्तही पडते असे काही तज्ज्ञांनी सांगितले आहे. या कारणाने तेल स्वस्तात मिळत असेल तर ते घ्यावे असा सूज्ञ विचार भारताने केला असणारच पण हे तेल स्वस्त असेल तर भारतातल्या ग्राहकांना ते स्वस्त मिळणार का? कारण सध्या तेलाच्या किंमतीवरून मोठे महाभारत सुरू आहे. भारताने तेलासोबतच नैसर्गिक वायूच्याही खरेदीचा करार अमेरिकेशी केला आहे. अमेरिका हाही एक तेलसंपन्न देश आहे.

Leave a Comment