स्वच्छ महाराष्ट्र


महात्मा गांधी जयंतीला राष्ट्रपतींनी स्वच्छ महाराष्ट्राच्या पहिल्या टप्प्याची पूर्तता झाली असल्याचे जाहीर केले असून महाराष्ट्रातल्या जनतेचे अभिनंदन केले आहे. हा टप्पा काय आहे हे समजून घेतले पाहिजे.या टप्प्यात महाराष्ट्राचा शहरी भाग हागणदारी मुक्त झाला आहे. महाराष्ट्र हे जास्तीत जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे. महाराष्ट्राची ४९ टक्के जनता शहरांत राहते. राज्यात २७ महापालिका आहेत यावरून या राज्याचे शहरीकरण किती मोठ्या प्रमाणावर झालेले आहे याची कल्पना येते. हा शहरी भाग हागणदारी मुक्त झाला आहे. अर्थात याचा अर्थ स्वच्छ राज्याची सगळीच मानके त्याने पुरी केली आहेत असा होत नाही. महाराष्ट्राचा नागरी भाग हा ओडीएफ झाला आहे. ओडीएफ म्हणजे ओपन डेफिकेशन फ्री.

याचा अर्थ असा की महाराष्ट्राच्या नागरी भागात आता कोणीही उघड्यावर शौचाला बसणार नाही आणि बसलेला दिसलाच तर त्याच्यावर कारवाई होईल. आजवर अनेक शहरांत लोक मोठ्या प्रमाणावर उघड्यावर शौचाला बसलेले दिसत असत. कारण त्यांना शौचालये उपलब्ध नव्हती. आता गेल्या काही दिवसांतल्या शौचालये बांधण्याच्या मोहिमांमुळे शहरातल्या प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक किंवा सार्वजनिक शौचालय उपलब्ध झाले आहे. त्याचमुळे उघड्यावर बसण्याचे प्रमाण जवळ जवळ संपले आहे.पण या मोहिमेची पुढची पायरी अजून गाठायची आहे. या पायरीवर प्रत्येक कुटुंबाला शौचालय उपलब्ध झालेले असेल. त्यासाठीही घराघरात जाऊन तिथे शौचालय आहे की नाही याची पाहणी करून घर तेथे शौचालय ही योजना राबवावी लागेल.

स्वच्छ महाराष्ट्राच्या पूर्ततेची पुढची आणखीही एक पायरीही आहे. आता आपल्या शहरातला शौचालयातला मैला हा बंद गटारात सोडला जातो. तो वहात वहात गावाबाहेरच्या मोठ्या नाल्यात येऊन मिसळतो पण स्वच्छ गावांच्या शेवटच्या टप्प्यात प्रत्येक शौचालयातला मैला त्यावर प्रक्रिया करून मगच गटारात सोडला जाईल. काही ठिकाणी त्यावर मैला गॅस संयंत्र बसवले जाईल आणि त्यातून जो गॅस प्राप्त होईल तो त्याच घरात वापरला जाईल. म्हणजे त्या टप्प्यावर शौचालयांची दुर्गंधी आणि त्यातील घाणीची विल्हेवाट लावण्याचा प्रश्‍न सोडवलेला असेल. महाराष्ट्राने या सार्‍या प्रक्रियेतला पहिला टप्पा चांगल्या प्रकारे पूर्ण केला आहे. पुढच्या दोन टप्प्यांचे काम येत्या दोन वर्षात होईल अशी अपेक्षा आहे. महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जयंतीला म्हणजे २०१९ साली हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

Leave a Comment