इंदूरचा आदर्श


स्वच्छ भारत अभियानाला काल तीन वर्षे पूर्ण झाली. या तीन वर्षांच्या काळात अनेक शहरांनी स्वच्छतेचे व्रत घेतले असल्यागत काम करून आपली शहरे स्वच्छ केली. २०१५ साली या स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत मध्य प्रदेशातल्या इंदूर शहराचा ८६ वा क्रमांक आला होता पण २०१६ साली या शहरात स्वच्छतेचे एवढे काम झाले की २०१६ साली त्याला देशातला पहिला क्रमांक मिळाला. या शहरात काय काय झाले आहे याचा अभ्यास प्रत्येक शहराने केला पाहिजे तर केवळ काही शहरेच नाही तर सारा भारत देश स्वच्छ होऊन जाईल. इंदूर महानगरपालिकेचे आयुक्त मनिष सिंग यांनी ही किमया केली आहे.

इंदूरला येण्यापूर्वी ते भोपाळला होते आणि तिथेही त्यांनी उत्तम काम केले होते पण २००९ सालच्या आयएएस बॅचचे विद्यार्थी असलेल्या मनिषसिंग यांना बदली झाल्यामुळे इंदूरला जावे लागले. पण त्यांनी भोपाळमध्ये केलेले कामही एवढे चांगले होते की त्याच्या जोरावर भोपाळचा क्रमांक पहिल्या दहा शहरात लागला. मनिषसिंग यांनी इंदूरमध्ये आपल्या कर्मचार्‍यांना तर सक्रिय केले आहेच पण खासगी कंपन्या आणि विद्यार्थी स्वयंसेवकांचाही चांगला वापर केला आहे. त्यांनी कचरा शहरात कोठेही दिसू नये यासाठी घरोघर जाऊन कचरा जमा करणारी मोठी यंत्रणा विकसित केली आहे. महानगरपालिकेचे ४०० अधिकारी शहरातल्या स्वच्छतेची पाहणी करीत पहाटे साडेपाच पासून फिरत असतात आणि त्यातल्या प्रत्येकाकडे जीप असते. या अधिकार्‍यांचे पहिले काम असते सार्वजनिक स्वच्छतागृहाची भरपूर पाणी टाकून स्वच्छता झाली आहे की नाही हे प्रत्यक्षात त्या स्वच्छतागृहात जाऊन पाहणे.

शहरातले १८०० उकिरडे आणि कचरा टाकण्याची ८५० उघडी ठिकाणे यांच्यावर मनिषसिंग यांची करडी नजर आहे आणि ते प्रत्येक ठिकाण साफ करण्यावर त्यांचे स्वत:चे लक्ष असते. विशेष म्हणजे या कामात महापौर मालिनी गौर याही रुची घेतात आणि सकाळची सफाई पहात फिरत असतात. मनिषसिंग यांनी शहरातली कचर्‍याची डबी हलवली आहेत. ती कचरा टाकण्यासाठी ठेवलेली असतात पण त्यांच्या बाहेर कचरा पडण्याने त्यांचा उपयोग तर होत नाहीच पण त्याच्या बाहेर कचरा साठत जातो. म्हणून त्यांना हलवून आता मनिषसिंग यांनी घराघरात जाऊन कचरा गोळा करण्यावर भर दिला आहे. शहरातली १४०० डस्ट बिन्स त्यांनी काढून टाकली आहेत. परिणामी या डब्यांतल्या कचर्‍यावर जगणार्‍या भटक्या कुत्र्यांची संख्या आपोआपच कमी झाली आहे.

Leave a Comment