कॅनडा विठ्ठलु


दक्षिणेची काशी म्हणून ज्या तीर्थक्षेत्राचा उल्लेख केला जातो त्या पंढरपुराचे वैशिष्ट्य असे आहे की या ठिकाणी देवाची मूर्ती नाही तर खुद्द देवच उभा आहे. हा विठ्ठल रुसून आलेल्या रुक्मिणीला शोधत आला होता, रुक्मिणी सापडली पण जाता जाता तो पुंडलिकाला भेटायला म्हणून त्याच्या घरी गेला. पुंडलीक हा आई वडलांचा भक्त होता आणि पांडुरंग घरी आला तेव्हा तो आई वडिलांची सेेवा करीत होता. भेटायला आलेल्या देवाला भेटण्यास त्याला सवड नव्हती म्हणून त्याने देवाला बाहेर उभे केले. तो देव अजून तिथे उभाच आहे. त्याला उभा करणारा पुंडलीक हा कर्नाटकातला होता म्हणून विठ्ठलालाही कानडा विठ्ठलु असे म्हटले जाते. आता योगायोग असा आला आहे की कानडा विठ्ठलुच्या पंढरीचा जीर्णोद्धार करण्यासाठी कॅनडाकडून मदत मिळत आहे.

कानडा विठ्ठलु आणि कॅनडाची मदत असा हा योग कॅनडाच्या सरकारकडून मिळत आहेे. ही मदत थोडी थोडकी नसून सुमारे २ हजार कोटी रुपये एवढी आहे. कॅनडाच्या सरकारने पंढरपुरातल्या सोयी वाढवण्यासाठी ही मदत देण्याचे जाहीर केले असून कॅनडाच्या भारतातीला दूतावासातले अधिकारी या मदतीतून काय काम करता येईल याची पाहणी करण्यासाठी पंढरपुरात येत आहेत. ही मदत प्रत्यक्षात दीर्घ मुदतीचे कर्ज असून त्यावर व्याजही नाममात्र लावले जाणार आहे. ते ४० वर्षात फेडायचे आहे . हा योग कसा जुळून आला याविषयी भाविकांच्या आणि पंढरपुरातल्या जनतेच्या मनात उत्सुकता दाटून आली आहे.

भारतावर ब्रिटीशांचे राज्य होते. त्याच वेळी कॅनडाही ब्रिटीशांचा गुलाम होता. तेव्हा पासून कॅनडा आणि भारत यांचे संबंध आहेत. त्या सामान्य वारशाची आठवण म्हणून कॅनडा सरकारने भारतातले एक शहर विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने शहराची निवड करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच राज ठाकरे यांना ते समजले आणि त्यांनी पंढरपूरचे नाव सूचित केले. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे कॅनडाला गेले होते. तिथे सुरू असलेल्या चर्चेत हा उल्लेख आला आणि त्यांनी या प्रक्रियेला गती दिली. पंढरपुरात अनेक प्रकारच्या सुधारणा करण्याची गरज आहे. तिथे आषाढी एकादशीला १० ते १२ लाख लोक येतात.त्या मानाने तिथल्या सोयी फार कमी आहेत. उत्तरेतली काशी पंतप्रधानांचा मतदारसंघ असल्यामुळे तिथे अनेक योजना राबविल्या जात आहेत पण दक्षिणेतल्या काशीला योजनांचा लाभ होत नाही. आता कॅनडाच्या रूपाने तरी या काशीचे भाग्य फळाला येते का हे पहायचे.

Leave a Comment