सध्या देशात कोणाला अच्छे दिन आले आहेत यावर घनघोर चर्चा सुरू आहे आणि काही असंतुष्ट आत्मे बात का बतंगड करून देशाची स्थिती फार वाईट आहे असे नकारात्मक चित्र निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. असे असले वस्तुस्थिती आशादायक आणि सकारात्मक आहे. गेल्या काही वर्षात भारतातले बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. २००५ ते २०१५ या कालावधीत बालकांच्या मृत्यूच्या प्रमाणात आठ टक्के घट झाली आहे. आपण महाशक्ती होण्याच्या कितीही बाता मारल्या तरीली बालकांच्या या मृत्यूबाबत आपण फार मागे होतो. केवळ बालकेच नाही तर महिला आणि अन्य दुर्बल घटकांच्या कल्याणाचा आपला निर्देशांक आफ्रिकेपेक्षाही कमी होता. भारताने मानवी निर्देशांक सुधारण्यासाठी वेगाने पावले टाकली पाहिजेत असे आपल्याला वारंवार बजावण्यात आले होते.
बालकांच्या स्थितीत सुधारणा
त्याचा परिणाम म्हणून आपण ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि नवजात बालकांच्या संगोपनासाठी आपल्या देशा ज्या सोयी करून देण्यात आल्या त्यांचा प्रभाव जाणवला असून नेहमीपेक्षा दहा लाख मुले कमी मृत्यूमुखी पडल्याचे दिसून आले आहे. हे प्रमाण टक्केवारीत मोजायचे तर ते आठ टक्क्यांनी कमी झाले आहे. जगातल्या अशा प्रकारच्या आरोग्यविषयक घटनांची नोंद घेणार्या लान्सेट या मासिकाने भारतातल्या या घडामोडीची दखल घेतली असून भारत सरकारने यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. संयुक्त राष्ट्रांनी बालक मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचा चंग बांधला असून २०३० साल पर्यंत हजार जन्मामागे २५ इतके असावे असे उद्दिष्ट ठेवले आहे.
भारतात हे प्रमाण २००० ते २००५ या काळात यापेक्षा जास्त होते म्हणून भारतातल्या या प्रमाणावर लक्ष ठेवण्यात आले आणि २००५ पासून २०१५ पर्यंत ते कमी करण्यात भारताला यश आले. २००५ साली भारतात पाच वर्षांच्या आतील ३ कोटी बालके मरण पावली होती. ते प्रमाण २००५ ते २०१५ या काळात दोन कोटी ९० लाखावर खाली आले. या मागे सरकारचे प्रयत्न आहेत. कारण सरकारने गरिबांच्या आरोग्यावर जादा खर्च करायला सुरूवात केली. लसीकरणाचा आग्रह धरला आणि स्तनपानाच्या बाबतीत प्रचार केला. विशेषत: मुलाचा जन्म झाल्यानंतरच्या पहिल्या तासात त्याला आईचे दूध पाजले पाहिजे कारण त्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तेव्हा या स्तनपानाचा प्रचार करण्यात आला. त्या सर्वांचा परिणाम होऊन बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले.