भारताचे प्रभावी ‘अस्त्र’


भारतीय शास्त्रज्ञांनी ब्रह्मोस हे स्वनातीत क्षेपणास्त्र तयार करून स्वत:ला जगातले सर्वात वेगवान क्षेपणास्त्र तयार करणारे राष्ट्री बनवले आहेच पण आता त्यापेक्षाही वेगवान आणि विशेषत: विनाशक अस्त्र नावाचे क्षेपणास्त्र तयार करण्यात यश मिळवले आहे. भारताचे शास्त्रज्ञ जर आपल्या पासून कित्येक कोटी मैल अंतरावरच्या मंगळ ग्रहावर यशस्वी चढाई करू शकतात तर ते आपल्या पासून काही शे किंवा फार तर चार ते पाच हजार मैल अंतरावरच्या पाकिस्तान किंवा चीनचा वेध घेणार नाहीत का ? त्यांनी तो घेतला असून त्याचसाठी अस्त्र निर्माण केले आहे. अस्त्र हे अनेक प्रकारांत ब्रह्मोस पेक्षा प्रगत असून ते सर्वात आव्हानात्मक मानले जात आहे. कारण ते लढावू विमानातून डागता येते.

ब्रह्मोस आणि अस्त्र यातला एक फरक असा की, अस्त्र हे हवेतून तर मारा करणारे आहेच पण ते ताशी एक हजार किलो मीटर्स वेगाने उडणार्‍या विमानातून फायर केले जाते. अशा विमानातून अस्त्र डागले तर ते शत्रूच्या अशाच लढावू विमानाला नष्ट करू शकते. शत्रूचे विमान उडत असले तरीही त्याच्यापासून ७० किलो मीटर अंतरावर असलेले अस्त्र त्याचा नाश करू शकते. नुकताच या अस्त्राचा चाचणी फायर करण्यात आला. ओरिसाच्या किनार्‍यावर ११ ते १४ सप्टेेंबर या काळात सात अस्त्रे डागण्यात आली. सुखोई – ३० एमकेआय या लढावू विमानातून ही चाचणी घेण्यात आली. प्रयोगात वापरण्यात आलेली विमाने पायलट विहीन होती. त्यांनी अस्त्र क्षेपणास्त्रे वाहून नेली आणि आधीच दिलेल्या सूचनांनुसार ते शत्रूच्या काल्पनिक लक्ष्यावर जाऊन आदळली.

या चाचणी बरोबरच या अस्त्राचा विकासाचा टप्पा आता पार पडला आहे असे संरक्षण खात्याकडून सांगण्यात आले. हे क्षेपणास्त्र संरक्षण खात्याच्या संरक्षण आणि संशोधन विभागाच्या संशोधकांनी तयार केले आहे. या कामासाठी हिंदुस्थान एअरानॉटिक्सच्या साह्याने काम करण्यात आले या क्षेपणास्त्राच्या निर्मितीत भारतातल्या ५० खाजगी कंपन्याही सहभागी झाल्या आहेत. या क्षेपणास्त्रात एक वेगळेच तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. आधीच्या सगळ्या क्षेपणास्त्रांसाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानापेक्षा ते वेगळे आहे. या तंत्रज्ञानाने हे अस्त्राला वाहून नेणारे विमान लक्ष्यापासून १५ मीटर्स अंतरावर जाताच त्यातले अस्त्र आपोआप बाहेर पडते आणि लक्ष्यावर जाऊन आदळते. ते वापरणारा भारत हा पहिलाच देश आहे.

Leave a Comment