सायबर गुन्हे वाढत आहेत


(फोटो सौजन्य – India Today)
आपल्याला अचानकपणे विमा नियामक प्राधीकरणाचा फोन येतो. आपण कोठून तरी उतरवलेल्या विम्याचा संदर्भ देऊन आपली चौकशी केली जाते आणि आपल्याला बोनस मिळाला आहे काय हे विचारले जाते. बोनस मिळालेला नसतो कारण तो मिळणारच नसतो. पण आपणही फसतो. तो बोनस मिळवून देणे हे आपले काम आहे तेव्हा त्यासाठी आपला खाते क्रमांक, आधार क्रमांक, पॅन नंबर विचारला जातो. आपणही बोनस मिळणार असल्याने ही माहिती सांगतो पण आपण नकळतपणे एक चूक करून बसलेलो असतो. आपली सारी माहिती आपण त्या भामट्याला सांगून टाकलेली असते. आपले खाते हॅक करून त्यातून पैसे काढण्याची सोय आपण त्याला करून दिलेली असते.

अचानकपणे आपल्या खात्यातले पैसे आपल्याला माहीत नसताना काढले जातात आणि आपल्यावर पश्‍चात्ताप करण्याची वेळ येते. आपल्याला अनेकदा याबाबत सावध केलेले असते. आपली ही माहिती कोणालाही सांगू नका असे बजावलेले असते तरीही एखाद्याला ती पोचलेली नसल्याने असे लोक या भामट्यांच्या जाळ्यात सापडतात. काल नगर येथे सायबर पोलिसांनी या संबंंधात एका तरुणाला अटक केली असून तो अशी बँक खाती हॅक करण्याचा व्यवसाय करीत असल्याचे आढळले आहे. बिहारमधील एका खेड्यातल्या या युवकाने आपल्या गावातल्या काही तरुणांना या धंद्यात ओढले असून जवळपास ४०० तरुण यात गुंतले असल्याचा संशय आहे. बेकार मुलांना लोकांचे ५० हजारापासून लाखो रुपयांपर्यंत पैसे ढापण्याची ही युक्ती चांगलीच जमली आहे.

यातल्या काही मुलांच्या घरी आपला दिवटा काय काम करून हे हजारो रुपये कमावत आहे याची माहितीही आहे पण एवढा पैसा घाम न गाळता मिळत असेल तर तो घ्यायला काय हरकत आहे अशी समजूत करून हे लोक आपल्या मुलांच्या चोरीकडे कानाडोळा करीत असतात. आपण ज्या वाढत्या प्रमाणात कॅशलेस व्यवहार करीत आलो आहोत त्या प्रमाणात हे गुन्हे वाढत चालले आहेत. पण या गुन्ह्यांचा तपास करण्याची यंत्रणा मात्र तोकडी आहे. आहे त्या यंत्रणेला या क्षेत्राची म्हणावी तशी माहिती नाही. यातून सायबर गुन्हे शोधून काढणारांची वानवा जाणवत आहे. ही कसर भरून काढत आता नव्या रोजगाराच्या संधीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुणांनी या नव्या विद्याशाखेकडे वळले पाहिजे. शेवटी गरज हाच नव्या रोजगाराचा आधार असतो.

Leave a Comment