तेल बियांत स्वावलंबन


आपल्या देशातली हरित क्रांती ही अपुरी आहे. या क्रांतीने केवळ गहू आणि तांदूळ याच दोन पिकांत आपण स्वावलंबी झालो आहोत. केवळ स्वावलंबीच नाहीतर आपण या दोन धान्यांचे जगातले मोठे निर्यातदारही झालो आहोत. मात्र तेलबिया आणि डाळी यांच्या बाबतीत आपल्याला स्वावलंबन साधता आलेेले नाही. डाळींच्या बाबतीत आपण वाईट अनुभव घेत आहोत. दोन वर्षांपूर्वी आपण २०० रुपये प्रतिकिलो दराने तुरदाळ घेतली. अन्य डाळीही गरिबांच्या आवाक्यात नाहीत. तेलांचे भावही गगनाला भिडणारे आहेत. आपण या दोन कृषि उत्पादनांबाबत स्वावलंबी झालो नाहीत याचा हा परिणाम आहे. विशेष म्हणजे गरिबांना प्रथिनांचा आणि स्निग्ध पदार्थांचा पुरवठा हीच दोन उत्पादने करीत असतात. पण ती उत्पादने आयात करावी लागतात.

तेलांच्या आयातीवर आपण दरसाल ८० हजार कोटी रुपये खर्च करीत असतो. हरित क्रांती झाली पण तिच्यात या दोन पिकांकडे दुर्लक्ष झाले. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी तेलबिया आणि डाळींच्या उत्पादनाला चालना देण्याची योेजना आखली होती पण नंतर तिच्याबाबत कोणत्याही सरकारने त्वरा केली नाही. आता या बाबत विचार सुरू झाला आहे. कोणत्याही सरकारला हरित क्रांती करायची असेल तर ती आधी प्रयोग शाळेत करावी लागते. म्हणजे आधी त्या पिकांचे सुधारित बियाणे विकसित करावे लागते. डाळी आणि तेलबियांच्या बाबतीत तसे काही प्रयत्न झाले आहेत आणि या दोन पिकांचे संकरित वाण तयार करण्यात आले आहे पण तेवढा प्रयत्न पुरेसा नाही. कारण या दोन पिकांच्या उत्पादनात काही प्रमाणात वाढ होऊनही त्यांचा पुरेसा पुरवठ होत नाही.

याचा अर्थ असा की एका बाजूला उत्पादन वाढत असले तरीही त्या मानाने लोकसंख्याही वाढत आहे. त्याच सोबत लोकांकडून त्यांना मागणीही वाढत आहे कारण लोकांच्या हातात पैसा यायला लागला आहे. माणूस दारिद्य्र रेषेच्यावर आला आणि त्याच्याकडे चार पैसे आले की तो आधी भाजी, डाळी आणि तेल यांची मागणी करतो. तशी मागणी वाढत असल्याने डाळी आणि तेलांची टंचाई जाणवून आपल्याला त्या महाग मिळत आहेत. यावर उपाय म्हणून आता आयसीएआर या संस्थेने या दोन उत्पादनांना प्राधान्याने पाटाचे पाणी द्यावे किंवा आधीच सिंचनाच्या सोयी असलेल्या भागात या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे अशी शिफारस केली आहे. त्याचाही चांगला परिणाम होईल. त्यासाठी एका बाजूने चांगला भावही द्यावा. आपल्या देशात गहू आणि तांदळाचे भाव फार चढले असे कधी होत नाही. तशी स्थिती डाळी आणि तेलांची आली पाहिजे.

Leave a Comment