सायकलीवरून पृथ्वीप्रदक्षिणा


ब्रिटनमधील खेळाडू आणि सायकलपटू मार्क ब्यूमॉंट याने ८० दिवसात सायकलीवरून पृथ्वी प्रदक्षिणा करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या प्रवासासाठी त्याला नेमकेपणाने सांगायचे तर ७९ दिवस १४ तास आणि १४ मिनिटे लागली. सायकलीवरून जग प्रवास करण्याच्या बाबतीत घालून दिलेले सगळे नियम पाळून त्याने हा नवा विक्रम प्रस्थापित करणारी सफर केली. पॅरिसपासून त्याचा हा दौरा सुरू झाला आणि त्याने ८० व्या दिवशी २९ हजार किलो मीटर्सचा प्रवास पुरा करून दौरा सुरू केलेलेच ठिकाण बरोबर गाठले तेव्हा त्याच्या स्वागताला त्याचे तर हजर होतेच पण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारीही हजर होते. त्यांनी या विक्रमाची नोंद आपल्या पुस्तकात होईल असे जाहीर केले.

मार्क ब्यूमॉंट हा स्कॉटिश असून त्याने यापूर्वीचा १२३ दिवसाचा विक्रम मोडीत काढला आहे. ३४ वषार्र्ंच्या ब्यूमॉंटने यापूर्वीही अनेक सायकल सफरी केल्या आहेत. त्याचा हा प्रवास संपला तेव्हा त्याने हे ८० दिवस म्हणजे आपल्या आयुष्यातले सर्वात लांब अडीच महिने होते असे म्हटले. त्याने या प्रवासातूनच आणखीही एक विक्रम केला आहे. महिनाभराच्या कालावधीत सायकलीने सर्वात जास्त अंतर कापण्याचाही विक्रम त्याने या मोहिमेतच नोंदला आहे. या विक्रमाची एक गंमत आहे. ब्यूमॉंटनेच पूर्वी पृथ्वी प्रदक्षिणेचा विक्रम नोंदला होता पण २००९ साली न्यूझिलंडच्या सायकलपटूने त्याचा विक्रम मोडून नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यावर आता ब्यूमॉंटनेच मात केली आहे.

ज्यूल्स व्हर्न या विज्ञान लेखकाने आपल्या अराउंड दी वर्ल्ड इन ८० डेज या कादंबरीत नायकाला जग प्रदक्षिणा करायला लावली आहे पण त्या विश्‍व यात्रेसाठी त्याने आगगाडी, विमान अशीही साधने वपरलेली दाखवली आहेत. ब्यूमॉंट याने मात्र अशी वाहने वापरलेली नाहीत. त्याने आपला समुद्र ओलांडतानाचा प्रवास केवळ विमानातून केला आहे पण बाकीचा सारा प्रवास सायकलीवरून केला असून तोही न थकता आणि विश्रांती न घेता केला आहे. त्याचा हा प्रवास सलग झाला आहेे. या आधी एका महिलेने या बाबत १४० दिवसांचा विक्रम केला आहे पण या मोहिमेत काही काळ विश्रांती घेतलेली होती. ब्यूमॉंटने मात्र सलग प्रवास केला आहे. त्याने या प्रवासातून आपल्या देशाचे नाव मोठे केले आहे.

Leave a Comment