डेमोग्राफिक डिव्हिडंड


१९९१ साली माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी भारत हे जगातले सर्वात तरुण राष्ट्र असल्याचे आपल्या नजरेस आणून दिले. देशाची वाटचाल, उपलब्ध होणार्‍या आरोग्याच्या सोयी, आर्थिक संपन्नता आणि सरकारचे कुटुंब नियोजनाच्या संबंधातले धोरण या सर्वांचा परिणाम होऊन प्रत्येक देशात लोकसंख्येची एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होत असते. जपानमध्ये अशा अनेक घटकांचा परिणाम होऊन वृद्धांची संख्या वाढली तर भारतात तरुणांनी लोकसंख्येचे मोठे अवकाश व्यापून टाकले. जपानमध्ये लहान मुले कमी आहेत म्हणून अधिक मुलांना जन्माला घालणारांना बक्षिसे द्यावी लागतात. जपानप्रमाणेच जर्मनी, अमेरिका, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, कॅनडा हेही देश लोकसंख्या घटण्याच्या समस्येने ग्रासले आहेत.

लोकसंख्येतल्या विविध वयोगटांचे प्रमाण आणि नाना देशांत त्यामुळे आगामी काही वर्षात निर्माण होऊ पाहणारी आर्थिक स्थिती याचे नेमके स्वरूप डेलॉय या संस्थेने स्पष्ट केले असून या संस्थेच्या अहवालात भारतासाठी सुखद असे बरेच काही आहे. या अहवालात २०३० सालपर्यंत जपान, भारत आणि चीन या तीन देशांची स्थिती कशी असेल यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. येत्या १२ वर्षात भारतात काम करण्याच्या वयाचे २० कोटी लोक वाढतील तर चीनमध्ये ते १० कोटीने कमी होतील असे या अहवालात म्हटले आहे. याचा अर्थ असा की चीनमधील १० कोटी लोक वय वाढल्याने कामातून जातील. अर्थात कमवणारे लोक अस कमी झाल्याचा परिणाम चीनच्या बचतीवर होईल. पर्यायाने चीन मागे पडायला लागेल.

भारतात २०३० साली काम करणार्‍या वयोगटातल्या लोकांची संख्या १०८ कोटी होईल. त्यामुळे भारत तेव्हा जगातली एक महाशक्ती झालेला असेल. चीन, जपान आणि भारत हे तीन आशियाई देश जगातल्या महाशक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्या अर्थकारणावर होणारा लोकसंख्येचा परिणाम असा बारकाईने अभ्यासला जात आहे आणि भारताचे भविष्य त्यामुळेच उज्ज्वल असल्याची ग्वाही मिळत आहे मात्र केवळ तरुणांची संख्या जास्त आहे एवढ्या एका कारणावरून देशाची प्रगती होत नसते. त्या संख्येला आणि तिच्यातल्या ऊर्जेला विधायक रूप द्यावे लागते. तरुण पिढी निर्व्यसनी असावी असा प्रयत्न करावा लागेल. तिला तांत्रिक दृष्ट्या सक्षम करावे लागेल. अन्यथा तरुण खूप आहेत पण त्यांचा देशाच्या उभारणीस काही फायदा नाही अशी स्थिती निर्माण होईल.

Leave a Comment