आणखी एक नामांतरवाद


सोलापूर विद्यापीठाला कोणाचे नाव द्यावे याचा वाद आता रंगात आला आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्‍वर यांचे नाव देण्यात यावे असा काही लोकांचा आग्रह आहे तर त्यांच्या विरोधात अहल्यादेवी यांच्या नावाची मागणी करणारा वर्ग उभा आहे. आपल्या देशात कोणता महापुरुष किती मोठा आहे यापेक्षा तो कोणत्या जातीचा आहे याला जास्त महत्त्व आहे कारण आपण महापुरुषांना जातीजातीत वाटून टाकले आहे. सिद्धरामेश्‍वर हे लिंगायत समाजाचे असल्याने त्यांच्या नावाबाबत हाच समाज आग्रही आहे तर अहल्याबाई या धनगर समाजाच्या असल्याने त्यांच्या नावासाठी या समाजाचे आंदोलन सुरू आहे.

गेल्या महिन्यात सोलापुरात या समाजाचा मोर्चा निघाला तर काल शिक्षण मंत्री विनोद तावडे हे सोलापुरात असतानाच लिंगायत समाजान मूकमोर्चा काढून आपल्या मागणीचा रेटा लावला. सरकारपुढे यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. सोलापूर हे केवळ एका जिल्ह्यासाठी असलेले देशातले एकमेव विद्यापीठ आहे. त्यामुळे त्याला कोणाचेही नाव न देता सोलापूर विद्यापीठ असे त्याचे नाव कायम ठेवावा असाही विचार मांडणारे लोक आहेत. महापुरुषांची नावे विद्यापीठाला देण्यामागे त्यांची स्मृती टिकवण्याची भावना असते पण अशी नावे दिली तरी त्यांची स्मृती रहात नाही. लोक अशा नावाचे शॉर्टफॉर्म रूढ करतात. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले पण आता लोक त्याला आता बीएएमयू (बामू ैया लघुनावाने ओळखायला लागले आहेत.

लोकांचे काहीही मत असले तरीही सत्ताधारी भाजपाची मात्र या प्रश्‍नाने गोची झाली आहे. कारण सध्या धनगर समाज आरक्षणाची मागणी मान्य न झाल्याने भाजपावर नाराज आहे. आता सोलापूर विद्यापीठाला अहल्याबाई होळकर यांचे नाव न दिल्यास या समाजाचा आणखी रोष होणार आहे. दुसर्‍या बाजूला लिंगायत समाज हा भाजपाचा खास मतदार आहे. महाराष्ट्रात आणि कर्नाटकाच्या उत्तर भागात या समाजाचा मोठा पाठींबा भाजपाला मिळतो. सोलापूर शहरात आणि जिह्यात या समाजाचे मोठे वर्चस्व आहे. तेव्हा याही समाजाला नाराज करून चालत नाही. तेव्हा या नामांतराच्या प्रश्‍नाने भाजपाची मोठी राजकीय कोेंडी झाली आहेे. विद्यापीठांच्या नावाबाबत असे वाद नेहमीच निर्माण केले जातात तेव्हा सरकारने याबाबत कसली तरी का होईना पण निमयावली तयार करणे गरजेचे झाले आहे.

Leave a Comment