बंदीशाळा नको रे बाबा


१९९३ च्या बॉंबस्फोटाच्या कटात सहभागी होऊन बेकायदा घातक शस्त्रे बाळगल्याच्या प्रकरणात तुरुंगवास सहन केलेला अभिनेता संजय दत्त याने तुरुंगवास संपल्यानंतर कारावासाविषयी आपले मत मांडले असून आपण या जगात वाटेल ती शिक्षा भोगायला तयार आहोत पण तुरूंगवास नको के बाबा असे म्हटले आहे. कारण तुरुंगवास ही आपले स्वातंत्र्य हिरावून घेणारी शिक्षा असते अशी कबुली त्याने दिली. म्हणूनच तु़रूंगातून सुटल्यानंतर त्याने तिरंगी ध्वजाला प्रणाम केला आणि खाली वाकून धरणीचे चुंबन घेतले. त्याची ही भावना मोठी विचार करायला लावणारी आहे. पण तिच्यातून आपल्याला कळणारी मार्मिक गोष्ट ही आहे की मानवी जीवनातले स्वातंत्र्य हे सर्वाधिक अनमोल असे मूल्य किंवा तत्त्व आहे.

आपण माणसाच्या तीन मूलभूत गरजा शाळेत शिकत आलो आहोत. अन्न, वस्त्र आणि निवारा. पण हे काही खरे नाही. या तीन गरजांपेक्षाही कोणाशी तरी सतत बोलत राहणे हे माणसाची अधिक मूलभूत अशी गरज आहे. म्हणून त्याला एखाद्या अपराधाबद्दल शिक्षा देताना त्याचे अन्न, वस्त्र किंवा निवारा यातली कोणतीच गरज कापली जात नाही. उलट कैदेत त्याला या तीन गरजा अधिक चांगल्या पुरवल्या जातात. पण त्याचा संवाद कापलेला असतो आणि खरी शिक्षा तर ही असते. संवादाचे स्वातंत्र्य कमी करणे हीच खरी शिक्षा असते. म्हणून खायला प्यायला मिळत असूनही माणसाला तुरूंगवास असह्य होत असतो.

बालमानस शास्त्रज्ञ मुलांना शिक्षा करण्यासाठी मारू नका असा सल्ला देतात. उलट मुलाला शिक्षा द्यायची असेल तर त्याच्याशी आईने अबोला धरावा. हा प्रयोग फारच परिणामकारक ठरतो. आईने बोलणे टाळले की मुले आपोआप शरण येतात आणि आई सांगेल ते ऐकतात. प्रमोद महाजन यांचा खून करणारा भाऊ प्रविण हा या खुनाबद्दल तुरूंगात गेला आणि मध्येेच सुटीवर परत आला. सुटीनंतर पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ आली तेव्हा त्याला तुरुंगातले दिवस आणि तिथला एकांतवास आठवला. ते एकांतवासातली वेदना त्याला आठवली आणि पुन्हा त्या शिक्षेवर जायचे म्हणताच त्याचे मन एवढे धास्तावले की त्यामुळे त्याला रक्तदाब प्रचंड वाढून तो मरण पावला. भावाचा खून करताना त्याने प्रसंग पडल्यास तुरुंगात जाण्याची मनाची तयारी केलीच असणार पण प्रत्यक्षात तुरुंगात स्वातंत्र्य हिरावले जाते आणि काय वाटते याचा त्याला अनुभव नव्हता. तो त्याला एकदा आत जाऊन आल्यानंतर आला आणि तो धास्तावला.

Leave a Comment